अभिनेत्री क्रिसन परेरा मुंबईत परतली शारजात अमली पदार्थ विक्रीचा खोटा गुन्हा

मुंबई पोलिसांच्या मदतीमुळे चार महिन्यांनंतर निर्दोष सुटका
अभिनेत्री क्रिसन परेरा मुंबईत परतली शारजात अमली पदार्थ विक्रीचा खोटा गुन्हा

मुंबई : चार महिन्यांनंतर ड्रग्जच्या गुन्ह्यात निर्दोष सुटका होऊन अभिनेत्री क्रिसन मार्क परेरा बुधवारी रात्री दुबईहून मुंबईत परतली. गुरुवारी तिने पोलीस आयुक्तांसह गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे विशेष आभार मानले. मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे तिची दुबईहून सुखरूप सुटका झाली असून, त्यांचे उपकार आपण विसरणार नाही, असे तिने सांगितले.

१ जूनला एका वेबसीरिजच्या ऑडिशनसाठी गेलेल्या क्रिसनला शारजा विमानतळावर ड्रग्जच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले होते. याच गुन्ह्यात ती २७ दिवस कारागृहात होती. हा प्रकार तिच्या पालकांना समजताच तिला वेबसीरिजच्या ऑडिशनसाठी पाठविणाऱ्या आरोपींनी तिच्या सुटकेसाठी प्रयत्न करतो, असे सांगून तिची आई प्रमिला मार्क परेरा यांच्याकडे ८० लाखांची मागणी केली होती. हा प्रकार संशयास्पद वाटताच तिने वाकोला पोलिसांत तक्रार केली.

या तक्रारीनंतर पोलिसांनी भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला व या गुन्ह्याचा तपास नंतर प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सावंत यांच्या युनिट दहाकडे सोपविण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी शांतीसिंग घासिसिंग राजपूत, राजेश दामोदर बोबाटे ऊर्फ रवी ऊर्फ प्रसादराव आणि ॲन्थोनी ॲलेक्स पॉल या तिघांना अटक केली. या तिघांच्या चौकशीत त्यांनी कट रचून क्रिसन परेराला ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न करून तिच्या आईकडे खंडणी वसुलीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले होते.

हा प्रकार उघडकीस येताच मुंबई पोलिसांनी केंद्रीय तपास यंत्रणा तसेच दूतावास कार्यालयाच्या मदतीने क्रिसन परेरा निर्दोष असल्याची काही कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांच्या आधारे कारागृहात असलेल्या क्रिसन परेराला तेथील स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला. २७ दिवसांनंतर जामिनावर बाहेर आल्यानंतर सर्व कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच क्रिसन ही २ ऑगस्टला दुबईहून मुंबईत परत आली.

गुरुवारी तिने पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त शशीकुमार मीना, पोलीस उपायुक्त राज तिलक यांची भेट घेतली. यावेळी तिने तिच्याबाबत घडलेला सर्व किस्सा पोलिसांना सांगितला.

कारागृहातील किस्से कथन केले

यावेळी तिने कारागृहातील अनेक किस्से सांगितले. कारागृहात असताना तिथे बांगलादेशीसह नायजेरियन नागरिक होते. बांगलादेशी नागरिक हिंदी तर नायजेरियन इंग्रजीत बोलायचे. कारागृहातील बाथरूममध्ये गरम पाणी होते, ज्याची ती कॉफी बनवायची. कैद्यांसाठी तिथे एसी बसविण्यात आले होते. तिला तिथे कुठलाही त्रास झाला नाही. तिथे एक मनोचिकित्सक होता. तो प्रत्येकांना गरजेनुसार औषध द्यायचा. मलाही काही औषधं देण्यात आली होती. जामिनावर बाहेर आल्यानंतर ती तिच्या नातेवाईकांकडे राहत होती. तिला जामीन मंजूर झाल्यानंतर तिची निर्दोष सुटका करण्यात आली. त्यानंतर तिला भारतात पाठविण्यात आले.

शारजात ड्रग्जच्या गुन्ह्यात

होते २५ वर्षांची शिक्षा

या आरोपींनी तिच्यासह इतर काही लोकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे तिने तसेच तिच्या आईने सांगितले. सुरुवातीला ड्रग्जच्या गुन्ह्यात २५ वर्षांची शिक्षा होते हे ऐकून तिला धक्काच बसला होता. मात्र, मुंबई पोलिसांच्या प्रयत्नामुळे आपण सुखरूप बाहेर आलो आणि आता आपल्या कुटुंबीयांसोबत असल्याचे तिने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in