वीज चोरांविरोधात अदानी आक्रमक; ७७४ जणांविरोधात गुन्हे

वीज चोरीविरोधात अदानीने युद्धच पुकारले आहे.
वीज चोरांविरोधात अदानी आक्रमक; ७७४ जणांविरोधात गुन्हे

मुंबई : वीज चोरांविरोधात अदानी इलेक्ट्रिसिटीने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. तब्बल ७७४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून २०२१-२०२२ मधील ३९१ तक्रारींच्या तुलनेत यंदा त्यात १०० टक्के वाढ झाली आहे. वीज चोरीविरोधात अदानीने युद्धच पुकारले आहे.

वीजचोरीविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये एटीअँडसीचे नुकसान ०.६१ टक्के कमी करत ते ५.९३ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात अदानी इलेक्ट्रिसिटीला यश मिळाले आहे. वीज जाळ्याचा प्रसार आणि संमिश्र ग्राहक क्षेणीचा विचार करता, देशातील एखाद्या वितरण कंपनीद्वारे हा सर्वात कमी नोंदला जाणारा एकूण तांत्रिक आणि व्यावसायिक तोटा आहे.
वीज चोरी हा अजामीनपात्र गुन्हा आहे. विद्युत कायदा, २००३ च्या कलम १३५ अन्वये वीज चोरी गुन्हेगारास व तो दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास दंड तसेच ३ वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. किंवा दोन्ही शिक्षा एकाच वेळी होऊ शकतात. वीज चोरी रोखण्यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीची दक्षता आणि अंमलबजावणी पथके तत्परतेने काम करत आहेत.

गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांच्या साहाय्याने नियमित सामूहिक छापे घालणे आणि त्यातून वीज चोरण्यासाठी वापरले जाणाऱ्या अनधिकृत वीज वाहिन्यांसारखी उपकरणे जप्त करणे आदी कारवाई केली जात आहे. सन २०२२-२३ मध्ये एकूण ७२.२५ टन विद्युत वाहिन्या आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

आर्थिक वर्ष २०२२-२३ मधील वार्षिक वीज चोरीच्या आकडेवारीवर भाष्य करताना, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले, “वीज चोरीचा भार हा प्रामाणिक देयके भरणाऱ्या ग्राहकांवर पडतो. अदानीला वीज ग्राहकांनी पसंती दिली असून वीज चोरीचा भार सर्वसामान्य ग्राहकांवर हे कंपनी खपवून घेणार नाही. त्यामुळे असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करून कंपनी तिच्या प्रामाणिक ग्राहकांच्या हिताचे रक्षणच करत असते. शहरातील काही ठराविक भागात वीजचोरीचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in