अदानींनी परदेशात पाठविलेले १ अब्ज डॉलर्स कोणाचे?

राहुल गांधी यांचा सवाल : संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा
अदानींनी परदेशात पाठविलेले १ अब्ज डॉलर्स कोणाचे?

मुंबई :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जाणारे उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून १ अब्ज डॉलर्स इतकी मोठी रक्कम देशाबाहेर गेली. ती रक्कम इतर मार्गांनी पुन्हा भारतात आली. त्या रकमेच्या माध्यमातून अदानी कंपनीच्या शेअर्सचे भाव वधारण्यात आले. हा पैसा नंतर देशात विमानतळ, बंदरे खरेदी करण्यास वापरण्यात आला. यात चिनी नागरिकाचा देखील सहभाग आहे, असा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांनी केला आहे. हा देशाच्या आणि पंतप्रधानांच्या प्रतिमेचाही प्रश्न आहे. या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. दरम्यान, अदानी समूहाने राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.

इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित झाले आहेत. या बैठकीच्या पहिल्याच दिवशी राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली. भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना राहुल गांधी म्हणाले, ‘‘गौतम अदानी यांच्या कंपनीच्या माध्यमातून देशातून १ अब्ज डॉलर्स इतकी मोठी रक्कम बाहेर नेण्यात आली. पुन्हा ही रक्कम विविध मार्गांनी भारतात आणण्यात आली. या मागचे मास्टरमाइंड हे गौतम अदानींचे बंधू विनोद अदानी आहेत. तसेच त्यांच्यासोबत नासिर अली शबान अली आणि एक चँग चुंग लिंग नावाचा चिनी नागरिक आहे. या पैशांच्या माध्यमातून अदानी समूहाच्या शेअर्सचे भाव वाढविण्यात आले. त्या पैशातून भारतातील विमानतळं आणि बंदरे विकत घेण्यात आली.’’

‘‘आता तर धारावी प्रकल्पही त्यांच्याकडे आहे. हे प्रकरण जागतिक दर्जाच्या तीन वर्तमानपत्रांनी छापले आहे. त्याचे कागदोपत्री पुरावेही त्यांच्याकडे आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली, पण ज्या व्यक्तीने चौकशी केली ती व्यक्तीच नंतर अदानींकडे कामाला लागली. खुद्द पंतप्रधानांनाच ही चौकशी नको होती,’’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला. ‘‘अदानींनी परदेशात पाठवलेले १ अब्ज डॉलर्स कोणाचे आहेत, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. ते पैसे अदानींचे आहेत का, अदानींचे नसतील तर कोणाचे आहेत, याची चौकशी झाली पाहिजे. कारण हा देशाच्या आणि खुद्द पंतप्रधानांच्याही प्रतिमेचा प्रश्न आहे. जी-२० परिषदेच्या निमित्ताने विविध देशांचे नेते येणार आहेत, त्यांना काय उत्तर देणार आहोत आपण, असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला. या संपूर्ण प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in