सेव्हन हिल्स रुग्णालयात पालिकेच्या दरानुसार उपचार अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

डायलिसिस सुविधांसह १०० बेड्सचा अतिदक्षता विभाग सेवेत
सेव्हन हिल्स रुग्णालयात पालिकेच्या दरानुसार उपचार अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

मुंबई : मुंबईतील महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर स्थितीतील रुग्णांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात डायलिसिस सुविधांसह १०० बेड्सचा अतिदक्षता विभाग रुग्णसेवेत कार्यान्वित करण्यात आला आहे. पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातून पाठविलेल्या रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयात डायलिसिससह अतिदक्षता विभागाची आणि संभाव्य इतर आजारांवरील उपचारांची सेवा महापालिकेच्या दरानुसार उपलब्ध करण्यात यावी. तसेच त्यावर सेव्हन हिल्स रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी यांनी देखरेख करावी, असे निर्देश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले आहेत.

उपनगरीय रुग्णालयातील निदान व वैद्यकीय उपचार सुविधांचा लाभ मुंबईसह मिरा-भाईदर, वसई-विरार ते पालघर-डहाणू, ठाणे-कल्याण, अंबरनाथ-बदलापूर या परिसरातील नागरिकांनादेखील होतो. दरवर्षी पावसाळ्यात पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयात रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढत असते. उपनगरीय रुग्णालयांचे प्रशासन पावसाळाजन्य आजारांच्या रुग्णांना दाखल करून, त्यांच्यावर आवश्यक ते उपचार केले जातात. विशेष म्हणजे रुग्णांवर उपचार करत असताना आजारांच्या स्थितीची सर्व माहिती संकलन करून, त्याचे विश्लेषण करून आरोग्य कार्यवाहीची दिशादेखील ठरवली जाते. यंदाच्या वर्षी ताप-अंगदुखीच्या तक्रारींचे रुग्ण गंभीर अवस्थेत उपनगरीय रुग्णालयांमध्ये दाखल होत असल्याचे महानगरपालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा रुग्णांच्या उपचारांमध्ये कमतरता राहू नये यासाठी महानगरपालिकेने मरोळस्थित सेव्हन हिल्स रुग्णालयाची निवड केली आहे.

कोविड संसर्ग कालावधीत सेव्हन हिल्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात रुग्ण शय्या कार्यान्वित होता. या पायाभूत सुविधांचा वापर नागरिकांच्या हितासाठी व्हावा, याकरिता महानगरपालिकेच्या १६ उपनगरीय रुग्णालयांत दाखल झालेल्या गंभीर अवस्थेतील रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयातील अतिदक्षता विभागात पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रुग्णांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयात १०० अतिदक्षता रुग्ण शय्या राखून ठेवण्याचे निर्देश शिंदे यांनी सेव्हन हिल्स रुग्णालय प्रशासनाला दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in