शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्‍याच अधिवेशनात सादर केल्‍या २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या

अतिवृष्‍टी व पूरग्रस्‍तांच्या मदतीसाठी कुठलीही तरतूद केलेली नसली तरी आपत्‍तीनिधीतून मदत उपलब्‍ध करून दिली जाणार आहे
शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्‍याच अधिवेशनात सादर केल्‍या २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या

शिंदे-फडणवीस सरकारने आपल्‍या पहिल्‍याच अधिवेशनात तब्‍बल २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्‍या आहेत. पुरवणी मागण्यांमध्ये अतिवृष्‍टी व पूरग्रस्‍तांच्या मदतीसाठी कुठलीही तरतूद केलेली नसली तरी आपत्‍तीनिधीतून मदत उपलब्‍ध करून दिली जाणार आहे. कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये अनुदान देण्यासाठी पुरवणी मागण्यांत ४ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्‍वातंत्र्याचा सुवर्णमहोत्‍सव साजरा करण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तर मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचे अमृत महोत्‍सवी वर्ष साजरे करण्यासाठी ७५ कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

राज्‍य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारी सुरू झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पहिल्‍या दिवशी विधिमंडळात २५ हजार ८२६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर केल्‍या. राज्‍यातील अनेक जिल्ह्यांत अतिवृष्‍टी व पूरस्‍थिती निर्माण झाली असून तब्‍बल १५ लाख हेक्‍टर पीकांचे नुकसान झाले आहे. एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्‍यामुळे पुरवणी मागण्यांत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भरीव तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा होती; परंतू नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अजूनही पूर्ण झालेले नसल्‍याने पुरवणी मागण्यांत तरतूद करण्यात आलेली नाही. केंद्रातून मिळणाऱ्या मदतीशिवाय लागणारा निधी आपत्‍तीनिवारण किंवा आपातकालीन निधीतून उपलब्‍ध करून देण्याचे सरकारचे नियोजन आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर करताना नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्‍मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्‍ती योजना जाहीर करताना मागील सरकारने कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही २५ हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती; मात्र कोविडमुळे आलेल्‍या आर्थिक संकटामुळे प्रत्‍यक्षात ही मदत देण्यात आली नव्हती. यावर्षी अर्थसंकल्‍प सादर करताना तत्‍कालीन अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आर्थिक वर्षांत ही मदत करण्याची घोषणा केली होती; मात्र राज्‍यात सत्‍ताबदल झाला आणि आता सत्‍तेवर आलेल्‍या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये ४ हजार ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना धान खरेदी अनुदानापोटी ५०० कोटी तर वाहतूक व उस गाळप अनुदानासाठी १२४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

आणीबाणीतील बंदींसाठी ११९ कोटींची तरतूद

१९७५ ते १९७७ या कालावधीत लोकशाहीच्या पुर्नस्‍थापनेसाठी लढा देणाऱ्यांना दरमहा मानधन देण्याची योजना फडणवीस सरकारने जाहीर केली होती; परंतू महाविकास आघाडी सरकारने सत्‍तेत आल्‍यानंतर हा निर्णय रद्द केला होता. शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा त्‍यात बदल करून ही योजना सुरू केली आहे. आणीबाणी बंदींना मानधन देण्यासाठी पुरवणी मागण्यांत ११९ कोटी ४५ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सागरी महामार्गासाठी १५० कोटींची तरतूद

गेली अनेक वर्षे रखडलेल्‍या रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाच्या कामाला गती देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आला होता. तेच काम पुढे नेताना सरकारने पुरवणी मागण्यांत १५० कोटींची तरतूद केली आहे.

नगर-बीड-परळी मार्गासाठी ४५७ कोटी

अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्‍वेमार्ग उभारणीसाठी तसेच नागपूर-नागभीड या रेल्‍वेमार्गासाठी अनुक्रमे ३५० व १०७ कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांत करण्यात आली आहे. अशी एकूण ४५७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पत्रकारांसाठीच्या आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर सन्मान योजनेसाठी देखील १५ कोटींची तरतूद पुरवणी मागण्यांत करण्यात आली आहे.

रायगडसाठी ५० कोटी

रायगड किल्‍ला व परिसराच्या विकास कामांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने ५० कोटींची तरतूद केली आहे. एसटी महामंडळासाठी १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

स्‍वातंत्र्याच्या अमृतमहोत्‍सवासाठी ५०० कोटींची तरतूद

देश स्‍वातंत्र्याचा अमृतमहोत्‍सव साजरा करत असून त्‍यानिमित्‍ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्‍यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यांत करण्यात आली आहे. तसेच मराठवाडा मुक्‍ती संग्रामाचा सुवर्णमहोत्‍सव साजरा करण्यासाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रामटेक तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २३ कोटी ११ लाख रुपयांचा निधी उपलब्‍ध करून देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in