

मुंबई : ‘धुरंधर’ या हिंदी चित्रपटाची पटकथा चोरल्याचा आरोप करणाऱ्या चित्रपट निर्माते संतोष कुमार आर. एस. यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी पटकथा चोरल्याचा आरोप पुन्हा करू नये, असे अंतरिम आदेश न्यायालयाने बुधवारी दिले. न्या. आरिफ डॉक्टर यांनी आदित्य धर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर हा प्राथमिक दिलासा दिला असून या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ एप्रिलला होणार आहे.
रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या ‘धुरंधर : द रिव्हेंज’ या चित्रपटाची पटकथा आपल्या ‘डी साहेब’ या नोंदणीकृत कामावरून चोरल्याचा दावा संतोष कुमार यांनी एका पत्रकार परिषदेत केला होता. आदित्य धर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून यामुळे आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला मोठी हानी पोहोचल्याचे दाव्यात म्हटले आहे. न्यायालयाने नमूद केले की, प्रतिवादी संतोष कुमार यांना या प्रक्रियेची नोटीस बजावण्यात आली होती; मात्र, सुनावणीदरम्यान त्यांचे कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हते. या प्रकरणापूर्वी धर यांनी संतोष कुमार यांना कायदेशीर नोटीस बजावून खोटे आरोप थांबवण्यास सांगितले होते. मात्र, त्या नोटिसीला प्रतिसाद न मिळाल्याने धर यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
सुनावणीपर्यंत विधान न करण्याचे निर्देश
धर यांच्यावतीने ज्येष्ठ वकील बीरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद केला की, वारंवार होणाऱ्या या आरोपांमुळे चित्रपट निर्मात्याच्या प्रतिमेचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे. सर्व बाजूंचा विचार करून न्यायालयाने संतोष कुमार यांना पुढील सुनावणीपर्यंत असे कोणतेही विधान करण्यापासून मज्जाव केला आहे.