रस्ते घोटाळ्यात मुंबईकरांचे हजार कोटी वाचवले आदित्य ठाकरे यांचा दावा

महापालिका आयुक्तांनी फक्त मुख्यमंत्र्यांना घोटाळ्यांमध्ये मदत करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
रस्ते घोटाळ्यात मुंबईकरांचे हजार कोटी वाचवले आदित्य ठाकरे यांचा दावा

मुंबई:महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या काही दिवस आधीच बोनस दिला जातो. मात्र, तो कालपर्यंत देण्यात आला नव्हता. माझ्या एका ट्विटनंतर तो देणे सरकारला भाग पडले. मुंबईत महारस्ते घोटाळा झाला आहे. रस्त्याचे कंत्राट हजार कोटींनी वाढवून ६ हजार कोटींपर्यंत नेण्यात आले होते. मात्र, आपण तो विषय लावून धरला होता. त्यामुळे हे काम थांबविण्यात आले. यामुळे मुंबईकरांचे एक हजार कोटी वाचल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केला. मुंबईत प्रदूषणाच्या प्रश्नाने उग्र रूप धारण केले आहे. धुळीचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आमच्यावेळी सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र, सरकारच्या वतीने पर्यावरणावर बोलायला कोणीच नाही. महापालिका आयुक्तांनी फक्त मुख्यमंत्र्यांना घोटाळ्यांमध्ये मदत करणे योग्य नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबईत रस्त्याचा महाघोटाळा आहे. हा मेगा रोड स्कॅम मी जानेवारीत समोर आणला होता. मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत. आधी ५ हजार कोटींचे कंत्राट दिले गेले. ते रद्द केले, मग ते पुन्हा १ हजार कोटींनी वाढवले. ॲडव्हान्स मोबिलायझेशन आणि मुख्यमंत्र्यांच्या मित्रांना फायदा होईल हे पाहिलं गेलं. पत्रकार परिषदेमुळे सव्वा सहाशे कोटी फायदा होणार होता त्यांना तो रद्द करावा लागला. मुंबईचे हजार कोटी तिथे आपण वाचवले, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

मुंबईचा जबाबदार आमदार म्हणून मला प्रशासकांनी काम सुरू असलेल्या ठिकाणी न्यावं आणि दाखवावं. आमचं सरकार येतंच आहे. आम्ही आलो की घोटाळेबाजांना सोडणार नाही. मविआचं सरकार येऊ दे, मुंबईला लुटू देणार नाही. खोके सरकार जनता घालवल्याशिवाय राहणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. मुंबईत प्रदूषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मुंबईत जिथं कामं सुरू आहेत तिथं स्प्रिंकलर, हिरवं कापड आहे का ते आधी दाखवा. बीकेसीत कुठेही हिरवं कापड दिसलंय का पाहा. एक हजार टँकर घेऊन रस्ते धुवायचे हा त्यावरचा उपाय नाही. बांधकामावर नियंत्रण आणा. या हजार टँकरमध्ये पाणी आणणार कुठून? राज्यात पाणीटंचाई आहे. रस्त्यावर पाणी टाकून प्रदूषणावर नियंत्रण मिळवणं हास्यास्पद आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in