मिहीरला कोळीवाड्यातील भर चौकात सोडा; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संताप, वरळीत नाखवा कुटुंबियांची भेट घेत केले सांत्वन

वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाने गाडी थांबवली असती तर एकाचा जीव वाचला असता. मात्र मिहीरने केलेला अपराध हा माफीलायक नाही. त्यामुळे...
मिहीरला कोळीवाड्यातील भर चौकात सोडा; आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला संताप, वरळीत नाखवा कुटुंबियांची भेट घेत केले सांत्वन

मुंबई : वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहाने गाडी थांबवली असती तर एकाचा जीव वाचला असता. मात्र मिहीरने केलेला अपराध हा माफीलायक नाही. त्यामुळे नाखवा कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढा देणार. मिहीर शहाला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवण्यात यावा, अन्यथा त्याला कोळीवाड्यातील भर चौकात सोडा, असा संताप शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. आदित्य ठाकरे, काँग्रेस आमदार अस्लम शेख यांनी बुधवारी नाखवा कुटुंबियांची वरळीतील निवासस्थानी भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

मिहीरने भरधाव वेगाने गाडी चालवत नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिली. यात कावेरी नाखवा कारच्या बम्पर आणि चाकात अडकल्या. मात्र मिहीर शहाने कावेरी यांना दोन किलोमीटर फरफटत नेले. नाखवा दाम्पत्याने गाडी थांबवण्याची विनंती केली, मात्र शहाने गाडी थांबवली नाही आणि एक बळी घेतला. नरकातून राक्षस जरी आला, तरी तो असे कृत्य करणार नाही. त्यामुळे मिहीर शहाला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालवले पाहिजे. नाखवा कुटुंबाला आम्ही न्याय मिळवून देणार, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

सर्वात कठोर शिक्षा करा

मिहीर राजेश शहा हा राक्षसच आहे. सीसीटीव्ही पूर्ण आहे, इंटेलिजन्स आहे, मग आरोपीला अटक करण्यास ६० तास का लागले?, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. पुढची कारवाई कशी असणार? असा सवाल करत बारवर कारवाई करणारे प्रशासन राजेश शहाच्या घरावर बुलडोझर चालवणार आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. इतका भयानक प्रकार मुंबई-महाराष्ट्रात होऊच कसा शकतो? असे ते म्हणाले. त्यामुळे असा भयंकर अपराध करणाऱ्या राक्षसाला देशातील सर्वात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

आरोपींना पाठीशी घालणारे सरकार- अस्लम शेख

हे सर्वसान्यांचे नव्हे, तर सर्वसामान्यांना गाडीखाली चिरडणाऱ्यांना पाठीशी घालणारे सरकार आहे. नाखवा कुटुंबीयांच्या वेदना, त्यांच्या डोळ्यांतील अश्रूंची किंमत सरकारला मोजावीच लागेल. हा अपघात नाही तर ही हत्या आहे, असा आरोप मालाड पश्चिम येथील काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in