महाराष्ट्राला राख, गुजरातला रांगोळी; आदित्य ठाकरे यांची टीका

नागरिकांच्या सहमतीनेच प्रकल्प पुढे नेला पाहिजे, दैनिक 'नवशक्ति' आणि 'फ्री प्रेस जर्नल'च्या वतीने आयोजित मुलाखती दरम्यान व्यक्त केले आपले मत
महाराष्ट्राला राख, गुजरातला रांगोळी; आदित्य ठाकरे यांची टीका

बारसूच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या वाट्याला राख आणि वेदांता फॉक्सकॉनच्या निमित्ताने गुजरातला रांगोळी, हा प्रकार आम्ही सहन करणार नाही. कुठलाही प्रकल्प असो, राजकारण्यांनी आपला अहंकार बाजूला ठेवून स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या सहमतीनेच तो पुढे नेला पाहिजे, असे परखड मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मांडले. पर्यावरण रक्षणाचे आव्हान फार मोठे असून, सर्वांनीच त्याच्या रक्षणात सहभाग घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.

दैनिक 'नवशक्ति' आणि 'फ्री प्रेस जर्नल'च्या वतीने आयोजित मुलाखती दरम्यान ते बोलत होते. बारसू प्रकल्पावरून सध्या राजकीय महाभारत सुरू आहे. त्याबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, ‘‘बारसू प्रकल्पाचा कोकणातील निसर्गसंपन्नतेवर नेमका काय परिणाम होणार आहे, हे सरकारने जनतेला सांगितले पाहिजे. रोजगार निर्मितीच हवी असेल तर वेदांता फॉक्सकॉन आणा ना महाराष्ट्रात. नाहीतर जे इतर राज्यांना नकोत ते प्रकल्प महाराष्ट्राला पाठवायचे, असे नको. म्हणजे महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी. या प्रकल्पाबाबत सरकारने स्थानिक जनतेशी संवाद साधला पाहिजे. समृद्धी प्रकल्पाबाबतही सुरुवातीला जनतेचा काही प्रमाणात विरोध होता. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर सादरीकरण करायला सांगितले. जनतेला विश्वासात घेतले. त्यानंतर लोकांनी पाठिंबा दिला. आघाडी सरकारच्या काळात उद्योगाच्या बाबतीत सामंजस्य करार झाले, त्यातील ९३ टक्के करारातील उद्योगांचे काम सुरू झाले आहे. मात्र, तेथे जनतेचा विरोध होताना दिसत नाही. कारण हेच आहे की, जनतेला सरकारने विश्वासात घेतले होते,’’ असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

‘‘मुंबईत आघाडी सरकारच्या काळात कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात १० हजार इलेक्ट्रिक बसेस आणायचे ठरविले होते. पण, आता ते कंत्राट रद्द करून ५० डिझेल बसेसचे कंत्राट देण्यात आले आहे. मेट्रोच्या आरे कारशेडला आम्ही त्यावेळी याच कारणामुळे विरोध केला. त्यावेळी जनतेला देखील पहिल्यांदा पर्यावरणीय मुद्दा समजावून द्यावा लागला. त्या ठिकाणी पाच बिबट्यांचा अधिवास होता. पर्यावरणाचे हे मुद्दे आपण लक्षात ठेवूनच विकास केला पाहिजे,’’ असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

विकासाची संकल्पना बदलली पाहिजे

‘‘पर्यावरणीय बदल हे आपल्या समोरील फार मोठे आव्हान आहे. खारघरला उष्माघातामुळे झालेल्या दुर्घटनेत गेलेल्या १४ बळींमधून आपण हेच पाहिले. मोठे प्रकल्प म्हणजेच विकास, ही आपली भूमिका आपण बदलली पाहिजे. विकास करताना पर्यावरणाचा विचार केलाच पाहिजे,’’ असेही ठाकरे म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in