
मुंबई : नवीन पूल बांधणीसाठी सायन पूल आधीच बंद केला आहे. त्यात एलफिन्स्टन पूल बंद करण्यात आल्याने होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी माहीम, दादर, वरळी आदी ठिकाणी अधिकचे वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिले आहे.
एमएमआरडीएने एलफिन्स्टन फ्लायओव्हर बंद केला असून, यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी वाहतूककोंडी होणार आहे. त्यातच सायन पूल आणि दादर येथील लोकमान्य टिळक पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने अधिक गैरसोय होऊ शकते. तरी महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम जोडमार्गावर तसेच विशेषतः माहीम, दादर, वरळी, शिवडी परिसरात अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करावेत. अन्यथा, मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी परिस्थिती अतिशय गंभीर होईल, असे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.