आदित्य ठाकरेंनी प्रदूषण महामंडळाकडून १०० कोटी घेतले; रामदास कदम यांचा आरोप

रामदास कदम म्हणाले, “१०० खोके कोठून घ्यायचे हे आदित्य ठाकरेंना चांगलेच माहिती आहे
आदित्य ठाकरेंनी प्रदूषण महामंडळाकडून १०० कोटी घेतले; रामदास कदम यांचा आरोप
Published on

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर बंडखोर आमदारांवर ‘पन्नास खोके, एकदम ओके’, अशी टीका शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून वारंवार केली जात असतानाच आता शिंदे गटात सामील झालेले माजी आमदार रामदास कदम यांनी आदित्यवर निशाणा साधला आहे. “खोक्याची भाषा आदित्य ठाकरेंनी करू नये. त्यांनी प्रदूषण महामंडळाकडून १०० कोटी रुपये घेतले. त्याचे काय झाले, याची चौकशी करण्यासाठी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले आहे. १०० खोके कुठून घ्यायचे, हे सर्व त्यांनाच माहीत आहे,” असा टोला लगावत रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

रामदास कदम म्हणाले, “१०० खोके कोठून घ्यायचे हे आदित्य ठाकरेंना चांगलेच माहिती आहे. आता कोकणात येऊन गद्दार आणि खोक्यांची भाषा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सांगू नये. अडीच वर्षांत बाप, बेटे कधीच बाहेर पडले नाहीत. बाप मुख्यमंत्री, बेटा मंत्री आणि नेता बाहेर अशी शिवसेनेची स्थिती आहे. आदित्य ठाकरेंनी १०० कोटी घेतल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी पत्र दिले आहे.”

शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलेल्या टीकेचाही कदम यांनी समाचार घेतला. “केशवराव भोसलेचे ड्रायव्हर होतो, असे मला भास्कर जाधव सांगतो. जाधव यांना राष्ट्रवादीतून मुळासकट ओढून काढण्यासाठी चिपळूणमध्ये पहिली सभा मी घेतली होती. ही सभा घेण्यासाठी बाळासाहेबांनीच आदेश दिले होते. भास्कर जाधवांना शिवसेनेत आणण्यासाठी मी प्रयत्न केला. १९९५मध्ये तिकीट देण्यासाठी मी प्रयत्न केला,” असेही रामदास कदम म्हणाले.

शिवसेना नेते भास्कर जाधव रामदास कदम यांच्यावर टीका करताना म्हणाले की, “रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली, त्यावेळी ते सातत्याने मीडियासमोर जाऊन डोळ्यामध्ये ग्रीसरीन टाकून ढसाढसा रडण्याचे नाटक करत होते. रामदास कदम यांच्यासारखा खोटा माणूस उभ्या हिंदुस्थानात सापडणार नाही.

मी राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री असताना तुम्ही माझे पाय धरले होते. मी राष्ट्रवादीत येतोय, मला तुम्ही विरोध करू नका, असे सांगत होता. माझ्या पोराला संपवायचे काम अनिल परब, उदय सामंतांनी केले. आज त्याच उदय सामंतांच्या पायावर रामदार कदम यांनी लोटांगण घातले.”

logo
marathi.freepressjournal.in