वरळी विधानसभा मतदासंघात मनसेकडून संदिप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता

वरळीमधून मनसेच्या संदिप देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
वरळी विधानसभा मतदासंघात मनसेकडून संदिप देशपांडे निवडणुकीच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता
Published on

येत्या काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. महिन्याभरात निवडणूक आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज ठाकरे यांनी काहीच दिवसांपूर्वी मनसे विधानसभेच्या २२५-२५० जागा लढवणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान राज ठाकरेंच्या मनसेनं वरळी विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केल्याचं दिसत आहे. वरळीमधून मनसेच्या संदिप देशपांडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाऊ शकतं, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. संदिप देशपांडे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवू शकतात, असं बोललं जात आहे. आज वरळीतील रहिवासी तसेच काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या पार्श्वभूमीवर या चर्चांनी आणखी जोर पकडला आहे.

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते वरळीमधून बिनविरोध निवडून गेले होते. ठाकरे गटाने त्यावेळी बिनविरोधसाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला होता. परंतु अलीकडच्या पाच वर्षात राज्यातील राजकीय वातावरण खूप बदललं आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा मोठा गट शिवसेनेतून फुटला आणि शिवसेनेची दोन शकलं झाली. दरम्यान अनेक आमदारांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदेंच्या सोबत जाणं पसंत केलं. नंतर निवडणूक आयोगानं शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण ही निवडणूक निशाणी एकनाथ शिंदेंना देऊ केल. त्यानंतर उद्धव ठाकरेंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नाव मिळालं, तर मशाल हे नवं चिन्ह मिळालं.

दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं चांगली कामगिरी करत ९ जागांवर विजय मिळवला. महाविकास आघाडीनं महायुतीला चारीमुंड्या चीत केलं. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज आहेत. अशा परिस्थितीत मनसेच्या संदिप देशपांडे यांना मनसेनं उमेदवारी दिल्यास मराठी मतांची विभागणी होऊन त्याचा फटका आदित्य ठाकरेंना बसू शकतो. महायुतीनं जर संदिप देशपांडेंना पाठिंबा दिला, तर ही निवडणूक निश्चितच अटीतटीची होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in