
वेदांत-फॉक्सकॉन गुजरातला गेल्याप्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे आता रस्त्यावर उतरणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी पुण्यातील तळेगाव येथे हे आंदोलन होणार आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने लक्ष न दिल्याने वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प हा गुजरातला गेला,असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. या प्रकल्पानंतर बल्कड्रग पार्क देखील बाहेर गेले. यामुळे महाराष्ट्राला मिळणारा मोठया प्रमाणातील रोजगार बाहेर गेला. प्रकल्प बाहेर गेल्याने १.५४ लाख कोटींची गुंतवणूक तर महाराष्ट्राने गमावलीच पण १ लाख रोजगार देखील आपण गमावले असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. शिंदे-फडणवीस सरकारकडून देखील त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारने काहीच न केल्याने हा प्रकल्प बाहेर गेला, असा आरोप भाजप तसेच शिंदे गटाकडून करण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी देखील भाजपाने केली आहे.
आता आदित्य ठाकरे हे वेदांत प्रकरणी रस्त्यावर उतरणार आहेत. युवासेनेच्या माध्यमातून राज्यात जनआक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी पुण्यातील तळेगाव येथे आदित्य ठाकरे हे जनआक्रोश आंदोलन करतील.