
शैक्षणिक सेवा-सुविधांमध्ये आमूलाग्र बदल करून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी शिक्षणासोबत वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. त्यामध्ये आता आर्थिक साक्षरता अभ्यासक्रमाची भर पडली आहे. मुंबईप्रमाणेच राज्यातील इतर शहरे, शाळा आणि शेतकऱ्यांपर्यंत आर्थिक साक्षरता नेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे उद्गार राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.
मुंबई महापालिका आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लि.च्या संयुक्त प्रयत्नातून आर्थिक साक्षरता मिशन हाती घेण्यात आले आहे. याअंतर्गत महापालिकेच्या इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरतेचे धडे देण्याकरिता अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. या मिशनचा शुभारंभ ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीत सोमवारी करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी खासदार अरविंद सावंत, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिक्षण समितीच्या माजी अध्यक्षा संध्या दोशी-सक्रे, सहआयुक्त (शिक्षण) अजित कुंभार, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कुमार चौहान, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिट्यूट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीश दत्ता, महापालिकेचे शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, शिक्षण अधिकारी राजू तडवी आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, आर्थिक साक्षरतेचे धडे देण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची पुस्तिकादेखील यानिमित्ताने प्रकाशित करण्यात आली.
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरातच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची इमारत आहे. असे असले तरी ज्याप्रमाणे सिग्नलवरचे लाल-हिरवे दिवे कळतात, तितकीच मर्यादित माहिती भांडवली बाजारातील लाल-हिरव्या खुणांवरून बहुतेकांना कळते. मुळात भांडवली बाजार अर्थात स्टॉक मार्केटला जुगार मानण्याची रूढ समज आता दूर झाली पाहिजे. पैसा कमावणे, त्यातून बचत करणे, गुंतवणूक करणे, परतावा मिळवणे या सर्व गोष्टी आर्थिक स्वावलंबनासाठी महत्त्वाच्या आहेत. समाज आणि देशाला पुढे न्यायचे असल्यास प्रत्येक व्यक्तीच्या हातात, बँक खात्यात आणि गुंतवणुकीतदेखील पैसा असणे आवश्यक आहे.
बीएसईमध्ये पर्यटकांना येता यावे यासाठी प्रयत्न
मुंबई महापालिकेच्या विद्यार्थ्यांप्रमाणेच राज्यातील इतर शाळा आणि शेतकऱ्यांपर्यंतदेखील आर्थिक साक्षरतेचे महत्त्व पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. आणखी तीन वर्षांनी १५० वर्षे पूर्ण करीत असलेल्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने त्यासाठी पाठबळ द्यावे, अशी अपेक्षा ठाकरे यांनी व्यक्त केली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इमारतीमध्ये पर्यटकांना येता यावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
स्मार्टबोर्ड उपलब्ध करणार
महापालिकेने विद्यार्थ्यांच्या पाठीवरून दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी ५४ हजारपेक्षा जास्त टॅब दिले गेले आहेत. ६०० शाळांमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम उपक्रम राबवला जात आहे. आता स्मार्टबोर्ड उपलब्ध करून दिले जातील. संगणक प्रयोगशाळा, खगोलीय प्रयोगशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. निरनिराळ्या आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत मिळून वेगवेगळे क्रीडाप्रकार, कला, बॅलेसारखे नृत्यप्रकार विद्यार्थ्यांना शिकता येत आहेत. स्वच्छता, लैंगिक समानता यासारखे सामाजिक पैलू विकसित केले जात आहेत. शिक्षण खात्यातील या बदलांना प्रत्यक्षात आणण्यासाठी अधिकारदेखील वाढवून दिले, असे ठाकरे यांनी नमूद केले.
१०० मास्टर ट्रेनर्संना प्रशिक्षण
आर्थिक साक्षरता मिशनमध्ये १०० मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून महापालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. या माध्यमातून विद्यार्थ्यांना येत्या जूनमध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून आर्थिक साक्षरतेचे धडे मिळणार आहेत. व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचविले जाईल, असे सहआयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.
महिलांनाही स्वावलंबनाचे धडे गरजेचे
बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे आशिषकुमार चौहान म्हणाले की, भारतातील एकूण राष्ट्रीय संपत्तीच्या ३० टक्के संपत्ती या एकट्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमुळे निर्माण झाली आहे. देशातील १० कोटी लोक आता भांडवली बाजारात गुंतवणूक करतात. देशातील प्रत्येक नागरिकाला पैसा कसा कमवावा, बचत कशी करावी, गुंतवणुकीतून संपत्तीची वृद्धी कशी करावी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आर्थिक संकट टाळण्यासाठी कर्ज व उधारीची परतफेड कशी करावी, हे कळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांप्रमाणेच महिलांनादेखील आर्थिक स्वावलंबानाचे धडे दिले जाणे गरजेचे आहे, असे चौहान यांनी नमूद केले.