मुंबई : असंवैधानिक मुख्यमंत्री दावोसला जवळजवळ ५० लोकांना घेऊन जाणार आहेत यामध्ये अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. कुटुंबातील व्यक्ती समजू शकतो, परंतु त्यांच्यापैकी काही जणांसाठी त्यांच्या मुलांनाही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत घेऊन चालले आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावर टीका केली आहे.
१५ ते १९ जानेवारीदरम्यान दावोस येथे होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि १० सदस्यीय शिष्टमंडळ सहभागी होणार आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला.
ते म्हणाले की, “महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारमधील काही मंत्री डावोसला जाणार, अशी माहिती मिळाली आहे. असंवैधानिक मुख्यमंत्री दावोसला जवळपास ५० लोकांना घेऊन जाणार आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मुलांनाही सुट्टी असल्याप्रमाणे सोबत नेले जात आहे, ही संख्या जवळपास ७० लोकांपर्यंत पोहोचली आहे. अशी माहिती आहे की केवळ १० जणांनी शिष्टमंडळ म्हणून ‘एमईएफ’ची आवश्यक राजकीय मंजुरी मागितली आहे, बाकीच्यांना वैयक्तिक सहलीसाठी सोबत नेले जात आहे. ७५ लोकांसाठीच्या या सुट्टीमध्ये सध्याचे खासदार, माजी खासदार, खासगी एजन्सींचे काही प्रचारक, सीएम आणि डीसीएमला पीएची संपूर्णटीम, मुख्यमंत्री यांचे ओएसडी यांचा समावेश आहे. येथे ५० लोक काय करतील? तिथे फक्त सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री स्वाक्षरी करतील. त्यामुळे इतके मोठे राष्ट्रीय शिष्टमंडळ कशाला?,”असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.