रुळावरून रेल्वे घसरण्याच्या घटना रोखण्यात प्रशासन अपयशी

काही दिवसांपूर्वीच रेल्वे अपघात, रेल्वे रुळांवरून घसरण्याचा घटना आणि जीवितहानीबाबत शासकीय आकडेवारी जाहीर झाली
रुळावरून रेल्वे घसरण्याच्या घटना रोखण्यात प्रशासन अपयशी

भारतीय रेल्वेचा इतिहास १६९ वर्षे जुना आहे. विशेष म्हणजे, या प्रदीर्घ इतिहासात मुंबईच्या लाईफलाईनशी निगडित अनेक सुखद घटना ऐकिवात आहेत; मात्र मागील काही वर्षांमध्ये मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळख असणाऱ्या लोकलच्या बिघाड, अपघाताच्या घटनांनी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काही दिवसांपूर्वीच रेल्वे अपघात, रेल्वे रुळांवरून घसरण्याचा घटना आणि जीवितहानीबाबत शासकीय आकडेवारी जाहीर झाली. यामध्ये ९० टक्क्यांनी प्रमाण घटल्याचे तसेच रेल्वेरुळांच्या देखभालीवर विशेष खर्च केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे; परंतु देशातील विविध रेल्वेमार्गांवर मागील काही महिन्यांमध्ये रुळांवरून रेल्वे घसरण्याचा घटना वाढल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवार, २६ जुलै रोजी सीएसएमटी येथे हार्बर मार्गावरील लोकलचा डब्बा घसरला, तर दुसरीकडे लोकमान्य टिळक टर्मिनस पाटलीपुत्र एक्स्प्रेस मुंबईकडून भुसावळकडे जात असताना चाळीसगाव स्टेशन नजीक वाघळी गावाजवळ या धावत्या एक्स्प्रेसचे इंजिन आणि डबे वेगवेगळे झाल्याच्या घटना घडल्या. दरम्यान, या एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे रुळावरून रेल्वे घसरण्याच्या घटना रोखण्यात रेल्वे प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे उघडकीस आले आहे.

रेल्वे हे देशातील सर्वात मोठे वाहतुकीचे साधन आहे. २.२५ कोटींहून अधिक प्रवासी दररोज रेल्वेप्रवास करतात. यामुळे अशा महत्त्वाच्या वाहतुकी वेळी थोडीशी चूक लाखो लोकांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते; परंतु रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे २०१३ ते २०२० या कालावधीत रुळावरून रेल्वे घसरून अपघात होण्याच्या सर्वाधिक घटना घडल्याचे शासकीय आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. बहुतांश घटनांत जीवितहानी झाली नसली तरी काही अपघातात मोठ्या प्रमाणात प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

कधी सिग्नलमध्ये बिघाड तर कधी रेल्वेरुळाला तडा, लोकलचे चाक रुळावरून घसरते इतकेच नव्हे रुळावर चालणारी लोकलची थेट फलाटावर उडी. अशा विविध घटनांनी उपनगरीय रेल्वे मार्गावरील सर्वसामान्य प्रवासी भयभीत झाले आहेत. यामध्ये मध्य रेल्वेवर सर्वाधिक घटना घडल्या आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in