पालिकेचा कारभार जुन्याच पद्धतीने! मालमत्ता कराची बिले वाटायला लिफाफे

मालमत्ता करात वाढ न झाल्यामुळे ४ हजार ५०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे
पालिकेचा कारभार जुन्याच पद्धतीने! मालमत्ता कराची बिले वाटायला लिफाफे

मुंबई : जगात नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध आहे. ऑनलाईनच्या युगात आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचा कारभार जुन्याच पद्धतीने सुरू आहे. मालमत्ता कराची बिल ग्राहकांना पाठवण्यासाठी आजही लिफाफे वापरण्यात येत आहे. त्यामुळे जगभरात नावलौकिक मिळवणाऱ्या मुंबई महापालिकेच्या जुन्या पद्धतीने कारभार सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मालमत्ता कर मुंबई महापालिकेचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहे. दरवर्षी सुमारे पाच ते सहा हजार कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात येतो. मात्र ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात जानेवारी २०२२ पासून माफी देण्यात आल्याने मुंबई महापालिकेला वर्षांला तब्बल ४०० कोटींवर पाणी सोडावे लागते. त्यात २०१५ पासून मालमत्ता करात वाढ न करण्यात आल्यामुळे मालमत्ता उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे मार्च २०२४ पूर्वी सहा हजार कोटी रुपये मालमत्ता करापोटी उत्पन्न मिळेल का अशी भिती पालिका प्रशासनाला सतावत आहे.

मालमत्ता कराची बिले पाठवण्यासाठी मुंबई महापालिका तब्बल पाच लाख रुपये खर्च करून लिफाफे खरेदी करणार आहे. यासाठी पालिकेच्या उपकरणे निर्धारण व संकलन विभागाने निविदा प्रक्रिया राबवली आहे. २१ नोव्हेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून लिफाफा पुरवण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान पांढऱ्या रंगाचे खिडकीसह प्रिंटिंग करून हे लिफाफे पुरवण्यात येणार आहेत.

नोव्हेंबरपासून बिल पाठवणार!

मात्र मालमत्ता करात वाढ न झाल्यामुळे ४ हजार ५०० कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. यासाठी नोव्हेंबरपासून मालमत्ता कराची दिले ग्राहकांना पाठवण्यात येणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in