मुंबई : अफ्रिकेत पिवळा ताप हा गंभीर आजार असून, या तापाची लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना लागण होण्याची शक्यता असते. मुंबईतून आफ्रिकन देशात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेच्या जुहू विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णालयात पिवळ्या तापावर प्रतिबंधात्मक लस सोमवार ३० ऑक्टोबरपासून उपलब्ध होणार आहे. या लसीकरण केंद्रात प्रती लाभार्थी ३०० रुपये शुल्क आकारले जाणार असून दर सोमवार व गुरुवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे.
पालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या सुचनेनुसार, त्याचप्रमाणे उप आयुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. रूस्तम नरसी कूपर रुग्णालयामध्ये पिवळ्या तापाचे लसीकरण केंद्र सुरू करण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे. केंद्र शासनाने देखील या लसीकरण केंद्रासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या दिल्या आहेत. लसीकरणासाठी येताना लाभार्थ्याला त्याचे पारपत्र (पासपोर्ट) सोबत असणे गरजेचे राहील, अशी माहिती कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते यांनी दिली आहे.
आफ्रिकन देशात जाणाऱ्या प्रत्येक विदेशी पर्यटकाला या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस देणे अत्यावश्यक आहे. या लसीमुळे संबंधित पर्यटक आफ्रिकन देशातून आपल्या देशात परतल्यानंतर त्यांच्या मूळ देशात आजार पसरत नाही. जागतिक आरोग्य संस्थेच्या निकषानुसार व पिवळ्या तापाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक प्रवाशाला आफ्रिकन देशात जाण्यापूर्वी पिवळ्या तापाची प्रतिबंधात्मक लस द्यावी लागते. ही लस घेतल्याचे अधिकृत प्रमाणपत्र संबंधित प्रवाशाने जोडल्याशिवाय या प्रवाशाला त्या देशात जाण्याचा व्हिजा मिळत नाही, असे कूपर रुग्णालयातील औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र केंभवी म्हणाले.