दिल्लीनंतर मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांचे जीणे असुरक्षित ; राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल

दिल्लीनंतर मुंबईत ज्येष्ठ नागरिकांचे जीणे असुरक्षित असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
दिल्लीनंतर मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांचे जीणे असुरक्षित ; राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा अहवाल

मेघा कुचिक/मुंबई : मुंबईत ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. दिल्लीनंतर मुंबईत ज्येष्ठ नागरिकांचे जीणे असुरक्षित असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.

मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यातून सोसायट्यांत राहणारे नागरिक सुरक्षित नसल्याचे दिसून येते. मुले, नातेवाईकांशिवाय राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची परिस्थिती आणखी गंभीर आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक मानसिक वैफल्यग्रस्त झाले असून त्यातील अनेकजण दीर्घ आजाराने ग्रस्त आहेत. तसेच अनेक ज्येष्ठ नागरिकांची मुले परदेशात स्थायिक आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मदतनीसाची मदत घेतल्याशिवाय जगणे अशक्य आहे. पण ही मदतही धोकादायक बनली आहे.

६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जाहीर केली. २०२० मध्ये ज्येष्ठांना लुबाडणाऱ्यांविरोधात ५२७ गुन्हे, २०२१ मध्ये ९८७ गुन्हे, २०२२ मध्ये ८४४ गुन्हे नोंदले गेले. २०२० मध्ये १२, २०२१ मध्ये ४ तर २०२२ मध्ये ५ ज्येष्ठांच्या हत्या झाल्या. महाराष्ट्रात ज्येष्ठांशी संबंधित २०२० मध्ये ४९०९, २०२१ मध्ये ६१९० तर २०२२ मध्ये ५०५९ गुन्हे नोंदले गेले.

जीवन आनंद संस्थेचे समन्वयक संदीप परब म्हणाले की, ज्येष्ठांची सुरक्षा ही सामाजिक विषयक आहे. कारण ज्या ज्येष्ठांची मुले परदेशात राहतात. त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे समाजाने याबाबतची त्यांची जबाबदारी घ्यावी. पोलीस हे ज्येष्ठ नागरिकांना काही बाबतींत मदत करतात. पण, त्यांनाही अनेक कामे असतात.

ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित गुन्हे (मुंबई)

वर्ष गुन्हे

२०२० : ५७२

२०२१ : ९८७

२०२२ : ८४४

ज्येष्ठांसाठी १०९० हेल्पलाईन नंबर

सर्व ज्येष्ठ नागरिकांना १०९० वर मदत मागता येते. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्थाही काम करतात. वैद्यकीय मदत किंवा शारीरिक अत्याचाराच्यावेळी १०९० ची मदत होत असते. सर्व पोलीस ठाण्यात ज्येष्ठांसाठी विशेष मदत केंद्रे आहेत. ते विविध सरकारी योजनांची माहिती देतात. तसेच मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी मदत करतात. प्रत्येक पोलीस ठाण्यात बीट मार्शल ज्येष्ठांवर लक्ष ठेवून असतात.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in