पावसाळ्यानंतर दोन मोठ्या बोगद्यांचे काम सुरू होणार

कोस्टल रोड ते फ्री-वे वाहतूक वेगाने होणार
पावसाळ्यानंतर दोन मोठ्या बोगद्यांचे काम सुरू होणार

मुंबई : कोस्टल रोड ते ईस्टर्न फ्री-वे दरम्यान वाहतूक वेगाने होण्यासाठी दोन बोगद्यांच्या बांधणीचे काम यंदाच्या पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे. या कामासाठी कंत्राटदार निवडीचे काम एमएमआरडीएकडून अंतिम टप्प्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात या मार्गासाठी लार्सन ॲॅण्ड टुब्रो व जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट या कंपन्यांनी निविदा भरल्या. लार्सन ॲॅन्ड टुब्रोने ७७६५ कोटी, तर जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टने ८५८९ कोटींची निविदा भरली. एमएमआरडीएच्या अंदाजानुसार या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ६३२७ कोटी रुपये आहे.

एमएमआरडीएचे अध्यक्ष मुख्यमंत्री आहेत. एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीसमोर मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. एमएमआरडीएतर्फे मंजुरी मिळाल्यानंतर या प्रकल्पासाठी सामुग्रीची जुळवाजुळव केली जाईल. हे ३.१ किमीचे बोगदे तयार झाल्यावर ते मुंबईतील सर्वात मोठ्या लांबीचे बोगदे असतील. हे दोन बोगदे सिग्नलविरहीत असणार आहेत. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल. कोस्टल रोड ते पूर्व द्रूतगती महामार्गावर ६ ते ८ मिनिटांत जाता येईल. हा प्रकल्प २०२७ च्या मध्यापर्यंत सुरू करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पामुळे दक्षिण मुंबईतून कोस्टल रोडमार्गे नवी मुंबईला जाता येऊ शकेल. तसेच वाहतूककोंडी कमी करण्यासाठी शिवडी ते वरळी हा उन्नत महामार्ग उभारला जात आहे.

सध्या रस्ते रुंद करण्यास जागा नाही. तसेच या भागात उन्नत रस्ते उभारणे शक्य होणार नाही. द. मुंबईत अनेक हेरिटेज इमारती आहेत. मरीन ड्राईव्ह हा भाग युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये मोडतो. त्यामुळे उन्नत मार्गाचा विचार सोडून द्यावा लागला. तसेच या भागातील जागा अत्यंत महागड्या आहेत. तेथील भूसंपादन अधिक कटकटीचे बनले असते. वेळही भरपूर गेला असता. तसेच या भागात गणपती विसर्जन केले जाते. मोठमोठ्या आकाराच्या गणेशमूर्ती या भागातून जातात. उन्नत मार्गामुळे त्याला अडथळा निर्माण झाला असता. त्यामुळे हा मार्ग भूमिगत करण्याचा निर्णय झाला.

'असा' असेल मार्ग

प्रत्येक बोगद्यात येण्यास-जाण्यास दोन-दोन मार्गिका असतील. मध्य व पश्चिम रेल्वेच्या खालून भुयारी मार्गाने हे बोगदे जातील. सध्या मेट्रो-३ ही मार्गिका जमिनीच्या २५ ते २७ मीटर खोल आहे. हा मार्ग ३० मीटरपेक्षा अधिक खोल असेल

logo
marathi.freepressjournal.in