वाडिया रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाचा अॅक्शन प्लॅन तयार

पालिका प्रशासनाने केलेल्या तपासणीत १,५७४ नर्सिंग होममध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने नोटीस बजावण्यात आली
वाडिया रुग्णालयातील आगीच्या घटनेनंतर अग्निशमन दलाचा अॅक्शन प्लॅन तयार

परळ येथील नवरोजी वाडिया रुग्णालयात लागलेल्या आगीच्या घटनेनंतर मुंबई अग्निशमन दलाने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. पालिका प्रशासनाने केलेल्या तपासणीत १,५७४ नर्सिंग होममध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने नोटीस बजावण्यात आली होती. आता पुन्हा एकदा या नर्सिंग होम्सची तपासणी करण्यात येणार आहे. यापैकी ३२९ नर्सिंग होम्सची तातडीने झाडाझडती घेण्यात येणार असून तपासणीत अग्निसुरक्षा यंत्रणा नसल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

९ जानेवारी २०२१ मध्ये भंडारा जिल्हा येथील शिशू केअर सेंटरमध्ये लागलेल्या आगीत १० चिमुकल्यांचा जीव गेला होता, तर भांडूप येथील ड्रीम्स मॉलमधील सनराइज हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये मार्च २०२१ मध्ये लागलेल्या आगीत ११ निष्पाप रुग्णांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनांनंतर मुंबईतील रुग्णालये, नर्सिंग होमच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून मुंबईतील सर्व रुग्णालयांसह सोसायट्या, आस्थापने, कार्यालयांना आपल्या ठिकाणी अग्निसुरक्षा सक्षम ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच्या अंमलबजावणीवर नजर ठेवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रत्येक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन वेळोवेळी फायर ऑडिट करण्यात येते आहे.

सक्षम अहवाल सादर करणे बंधनकारक!

अग्निशमन दलाकडून करण्यात येणाऱ्या फायर ऑडिटमध्ये अग्निशमन यंत्रणा नसल्यास संबंधित व्यवस्थापनाला नोटीस बजावली जाते. यामध्ये १२० दिवसांच्या मुदतीत अग्निशमन यंत्रणा सक्षम करून अग्निशमन यंत्रणेला अहवाल सादर करणे बंधनकारक असते. अग्निशमन यंत्रणा सक्षम करून अहवाल सादर केला नाही, तर कायदा विभागाच्या सल्ल्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू केली जाते. यामध्ये गुन्हाही नोंदवण्यात येतो. न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेकडून कारवाई केली जाते. यामध्ये वीज, पाणी कनेक्शन कापणे, सील करण्याची कारवाई होऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in