
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी पुण्यात झालेल्या भेटीमुळे मविआत संशयकल्लोळ निर्माण झाला आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने या प्रकरणाबाबत उघड नाराजी व्यक्त केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी केली आहे. दरम्यान, शरद पवार यांची येत्या काही दिवसांत भूमिका स्पष्ट न झाल्यास शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने मिळून निवडणुका लढविण्याची रणनीती तयार करण्यास सुरुवात केल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. खा. सुप्रिया सुळे यांनी मात्र या विषयावर मी स्वत: शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांशी बोलले असून, त्याची चिंता करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यातील एका उद्योगपतीच्या निवासस्थानी भेट झाली. या भेटीची माहिती कोणालाही देण्यात आली नसल्याने या भेटीतील चर्चेसंदर्भात संभ्रम निर्माण झाला. शरद पवार आणि अजित पवार यांनी आमचे काका-पुतण्याचे नाते आहे. राजकीय स्थिती कशीही असली तरी आम्ही नात्यामुळे कधीही-कुठेही भेटू शकतो. त्यात गैर काहीच नाही, असे स्पष्ट केले होते. मात्र या स्पष्टीकरणामुळे शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे समाधान झालेले नाही. सामना दैनिकात देखील या भेटीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली असून, स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील तो आमच्यासाठी चिंतेचा विषय आहेच. लपून होणाऱ्या भेटी योग्य नाहीत. हायकमांडच्या पातळीवर याबाबत चर्चा होईल. कोणत्या पक्षात काय चाललेय हा आमचा विषय नाही. शरद पवार हे काय भूमिका घेतात हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र जो कोणी भाजपविरोधात असेल त्याला सोबत घेऊन चालू, पण जनतेच्या मनात होणारा संभ्रम, अविश्वास दूर करणे आवश्यक असल्याचे पटोले म्हणाले आहेत.
नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांची रविवारी भेट घेऊन चर्चा केली आहे. या चर्चेत शरद पवार-अजित पवार भेटीचा विषय देखील होता. नजीकच्या काळात जर शरद पवारांची भूमिका स्पष्ट झाली नाही, तर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने एकत्र येऊन निवडणुका लढण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशी चर्चाही या भेटीत झाल्याचे समजते. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने लोकसभेच्या सर्व म्हणजे ४८ जागांचा आढावा घेण्यास सुरुवातही केली आहे. उद्धव ठाकरे येत्या काही दिवसांत हा आढावा घेणार आहेत. त्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी बारामती आणि शिरूर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले असणारे मतदारसंघ स्वबळावर लढविण्याची मागणी केली आहे.