
मुंबई :मुंबई महापालिकेच्या विविध कामांच्या घोटाळ्याची ‘एसआयटी’मार्फत चौकशी सुरू आहे. या चौकशीसाठी मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी, अभियंता, डॉक्टर आदींना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात येत आहे. एसआयटीचे समन्स हातात पडताच, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणत आहेत. विशेष म्हणजे, दररोज १० ते १२ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी एसआयटीच्या कार्यालयात हजेरी लावावी लागत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, मुंबई महापालिकेतील १२ हजार कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीला वेग आला आहे.
कोविड सेंटरच्या कामांमध्ये अनियमितता झाली असून साडेतीन हजार कोटींचा घोटाळा, दहिसर येथील भूखंड जादा टक्क्यांनी खरेदी, रस्ते कामांत अनियमितता, विनानिविदा वर्क ऑर्डर, एकूणच मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध कामांत १२ हजार कोटींच्या कामांत अनियमितता झाली असून या घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली. राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केल्यानंतर एसआयटी प्रमुख संग्राम सिंग निशाणदार यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू आहे. एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी पालिका मुख्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली. मात्र आता चौकशीला वेग आला असून रस्ते, पूल, रुग्णालयांतील डॉक्टर आदींना चौकशीसाठी समन्स बजावण्यात येत आहे.
मुंबई महापालिकेच्या विविध कामांचे ‘कॅग’च्या टीमकडून ऑडिट करण्यात आले. त्यानंतर ईडीने चौकशी करत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरी छापा टाकला. तर आता एसआयटीच्या टीमकडून चौकशी सुरू असून पालिकेच्या विविध विभागांतील अधिकारी, अभियंता, डॉक्टर आदींची रोज चौकशी करण्यात येत असल्याने अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
या कामांची चौकशी
कोरोना काळातील कामांची नोंदणी नाही
कोरोना काळात विनानिविदा मागवता कामे दिली
राज्य सरकारच्या नियमानुसार ५ कोटींच्या वरील कामासाठी थर्ड पार्टी ऑडिट करणे गरजेचे, पण ३,३५५.५७ कोटींची १३ कामांचे थर्ड पार्टी ऑडिट केले नाही
कामे देताना कंत्राटदारांचा इतिहास बघितला नाही, परिणामी कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाला
मुंबई महापालिका प्रशासनाने विना निविदा २१४.४८ कोटींची कामे दिली
६४ कंत्राटदारांना विना निविदा ४,७५६ कोटींची कामे दिली पण करार केला नाही
दहिसर येथील भूखंड ७१६ जादा टक्क्यांनी खरेदी केला
चौकशी सुरूच - संग्राम सिंग निशाणदार
मुंबई महापालिकेच्या विविध विभागांतील कामांच्या घोटाळ्याची चौकशी सुरू असून रोज काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी एसआयटीच्या कार्यालयात बोलावण्यात येते. अद्याप तरी चौकशी सुरु आहे, असे एसआयटीचे प्रमुख संग्राम सिंग निशाणदार यांनी सांगितले.