राहुल गांधीच्या चौकशी विरोधात कार्यकर्त्यांची आक्रमक भुमिका, राजभवनवर धडक मोर्चा

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
राहुल गांधीच्या चौकशी विरोधात कार्यकर्त्यांची आक्रमक भुमिका, राजभवनवर धडक मोर्चा

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या विरोधात देशभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत गेले दोन दिवसांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली राजभवनवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री नसीम खान यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतले.

केंद्रातील भाजपचे सरकार काँग्रेस नेतृत्वाला सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, अशा दबावाला अथवा दहशतीला आम्ही भीक घालत नाही. देशातील जनतेचे प्रश्न हाती घेत मोदी सरकारला सातत्याने कोंडीत पकडणारे राहुल गांधी देशाचा आवाज बनले आहेत. त्यांच्यावरील सूडबुद्धीच्या कारवाईमुळे काँग्रेसचा कार्यकर्ता पेटून उठला आहे. ही कारवाई आम्ही सहन करणार नाही. केंद्र सरकारविरोधातील आमचा संघर्ष सुरूच राहील, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी दिला. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही केंद्र सरकारवर टीका केली.सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना नोटिसा पाठवून नाहक त्रास दिला जात आहे. तीन दिवस राहुल यांचा चौकशीच्या नावाखाली छळ केला जात आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता केंद्र सरकारची हा दडपशाही सहन करणार नाही. आमचे हे नेते मोदी सरकारसमोर कदापि झुकणारे नाहीत, असा इशारा थोरात यांनी दिला.

भाई जगताप म्हणाले की, भाजपच्या दडपशाही विरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी सातत्याने केंद्रातील भाजप सरकारला प्रश्न विचारत आलेले आहेत, जनतेचे मुद्दे मांडत आलेले आहेत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी भाजप सरकार आज काँग्रेसला बदनाम करू पाहत आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणातून काही निष्पन्न झालेले नाही. भाजपच्याच सरकारने त्यांना क्लीनचिट दिलेली आहे. असे असतानासुद्धा नाहक त्रास देण्यासाठी आणि महागाई व बेरोजगारीसारख्या मूळ मुद्यांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजप हे षडयंत्र करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

या मोर्चात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मत्स्यसंवर्धन मंत्री अस्लम शेख, महिला आणि बालकल्यणा मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री विश्वजित कदम, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, आदी नेते सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in