
मुंबई : मुंबई महापालिकेच्या परीक्षण खात्यांतर्गत असलेल्या रोड, रिपेअर, ड्रेनेज, विद्युत खाते, स्ट्रॉम वॉटर ट्रेन, मालमत्ता या खात्यातील तसेच उद्यान मलेरिया, बाजार व पाणी खाते, रुग्णालये, बाजार, देवनार पशुवधगृह, उदंचन केंद्र या खात्यातील कामगारांनी आंदोलनाचा बडगा उगारला आहे. पालिकेच्या अनेक विभागात सरळ सेवा भरती होत नसल्याने मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. परिणामी सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर कामात अतिरिक्त भार पडत आहे. तरीही पालिकेकडून या रिक्त जागावर इतर कामगारांची भरती केली जात नाही. याच्याच निषेधार्थ म्युनिसिपल मजदूर संघटनेच्या वतीने मंगळवार, ३ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते ४ च्या दरम्यान आझाद मैदानावर हे धरणे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
सद्यस्थितीत मुंबई महापालिकेच्या विविध पदावर भरती होत आहे. मात्र, पालिकेच्या परीक्षण खात्यांतर्गत भरतीकडे पालिका प्रशासन जाणूनबुजून कानडोळा करत असल्याचे चित्र आहे. परीक्षण खात्याच्या विविध पदावरील जागा रिक्त असल्याने अतिरिक्त कामाचा बोजा सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर पडत आहे. तसेच अनेक रिक्त जागेमुळे महापालिकेची दैनंदिन कामे खोळंबली आहे. परिणामी नागरिकांचा रोष कामगार-कर्मचारी-अभियंते यांना सहन करावा लागत आहे. येणाऱ्या २ वर्षामध्ये वर नमूद खात्यातील अनेक कामगार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेची संपूर्ण व्यवस्थाच कोलमडून पडणार आहे. त्यामुळे भविष्यातली ही अडचण पाहता तत्काळ ही रिक्त पदे सरळसेवे अन्वये भरणे आवश्यक असल्याने म्युनिसिपल मजदूर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
आंदोलनातील मागण्या
लाडपागे समितीच्या शिफारशी अन्वये वारसाहक्काच्या नोकरीचा पूर्वलक्षी प्रभावाने (जे या खात्यातून सेवानिवृत्त / वैद्यकीयदृष्ट्या अपात्र झालेल्या) कामगारांना लाभ द्यावा.
ड्रेनेज खात्यामध्ये प्लंजरमन व पानबुड्या यांना वारसा हक्काचा लाभ देताना २० वर्ष सेवेची जाचक अट रद्द करावी, हि आपली प्रमुख मागणी आहे.
महापालिकेचे पूर्वीचे परिपत्रक क्र. सी.पी.ए. १२२ अन्वये महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या एका कामगार किंवा कर्मचाऱ्यांच्या एका मुला/मुलीला महापालिका सेवेत सामावून घेणे.