मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत WhatsApp क्रमांकावर धमकीचा मेसेज आला आहे. ४०० किलो आरडीएक्सच्या स्फोटानंतर 'संपूर्ण मुंबई हादरणार' असा दावा...
मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी
Published on

अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांना बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली असून मुंबईत सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर, "मुंबई शहरात १४ पाकिस्तानी दहशतवादी घुसले आहेत. शहरात ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्ब बसवले असून या बॉम्बस्फोटांनंतर संपूर्ण मुंबई हादरेल", असा संदेश पाठवण्यात आला आहे. उद्याच्या (दि.६) अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे.

'लष्कर-ए-जिहादी’च्या नावाने धमकी

शहरभरात ३४ वाहनांमध्ये ३४ ‘ह्युमन बॉम्ब’ लावण्यात आले आहेत आणि या स्फोटामुळे संपूर्ण मुंबई हादरून जाईल. ‘लष्कर-ए-जिहादी’ नावाच्या संघटनेने ही धमकी दिली असून १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावा केला आहे. बॉम्बस्फोटांसाठी तब्बल ४०० किलो आरडीएक्सचा वापर करण्यात येणार असल्याचेही धमकीच्या संदेशात नमूद आहे.

व्हॉट्सॅप मेसेजचा स्त्रोत शोधतायेत मुंबई पोलिस

धमकीनंतर मुंबई पोलिस सतर्क झाले असून राज्यभर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या धमकीचा सर्व अंगांनी तपास सुरू आहे. क्राईम ब्रँचने या धमकीप्रकरणी तपास सुरू केला असून एटीएस तसेच इतर यंत्रणांना देखील माहिती देण्यात आली आहे. सायबर पथक व्हॉट्सॅप मेसेजचा स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे. सुरक्षित आणि शांततेत सण पार पडावा यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्याचे पोलिसांनी आश्वस्त केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in