
मुंबई : मुंबई महापालिकेतील माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सर्व पदांचा राजीनामा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवला.
भाजपमध्ये करणार प्रवेश?
स्थानिक नेतृत्वावरील नाराजीतून राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान तेजस्वी घोसाळकर या लवकरच भाजप पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. तर ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
ऐन निवडणुकीच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला अनेक आजी माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते रामराम करत आहे. त्यातच ठाकरे कुटुंबाशी जवळचे संबध तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा स्थानिक नेतृत्वाला कंटाळून राजीनामा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाली होती. त्यानंतर आता त्यांनी हा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तेजस्वी यांनी राजीनाम्यात लिहिले आहे की, मी तेजस्वी घोसाळकर महिला - दहिसर विधानसभा प्रमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), या पदावरून वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. या पदावर कार्य करताना मला पक्षाच्या कार्यपद्धतीशी एकनिष्ठ राहून कार्य करण्याची संधी मिळाली, त्याबद्दल मी पक्षप्रमुख व आपले मन:पूर्वक आभार मानते. माझा राजीनामा स्वीकारावा.
तेजस्वी घोसाळकर यांच्या राजीनाम्यामुळे उत्तर मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
तेजस्वी यांना जीवे मारण्याची धमकी
गेल्या महिन्यात तेजस्वी यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. एका व्हॉट्सॲप ग्रुपवर त्यांना धमकीचा मेसेज आला होता. लालचंद इनको देखकर सुधर जा, इसकी बिवी को मत मरवा देना लालचंद, असा तो मेसेज होता. याचा अर्थ, लालचंद, याला बघून सुधार, त्याच्या बायकोला मारू नको.
कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?
तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे घनिष्ठ संबंध आहेत. तेजस्वी या शिवसेना ठाकरे गटाचे नेते दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. तसेच, ज्येष्ठ नेते विनोद घोसाळकर यांच्या त्या सून आहेत.