लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी अनेकदा प्रवासी रेल्वे स्थानकात हातात बॅग घेऊन उभे असल्याचे दिसतात. प्रवाशांची गर्दी आणि त्यात ताटकळत उभे राहत प्रवाशांना गाड्यांची वाट पाहावी लागते. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानक येथे लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना १० रुपये प्रति तास या नाममात्र शुल्कात नवीन अत्याधुनिक वातानुकूलित वेटिंग रूम सुरू केले आहे.
नुकतेच लोकमान्य टिळक टर्मिनस येथील सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या नूतनीकरण, देखभाल आणि हस्तांतरण मॉडेलवर वेटिंग रुमचे अपग्रेडेशन मुंबई विभागाद्वारे केले गेले. प्रतीक्षालयांमध्ये पूर्वी गर्दी आणि सुविधांचा अभाव यासह अनेक समस्या होत्या. वेटिंग रूममध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत प्रवेश आणि प्रवाशांकडून वाढवलेला वापर यांचा सामना प्रवाशांना करावा लागत होता.