

धैर्य गजारा / मुंबई
एअर इंडिया एक्स्प्रेसने ‘द फ्लाइंग कॅनव्हास’ या विशेष कलाकृतीने नटलेल्या बोईंग ‘७३७-८’ विमानाचे अनावरण केले आहे. या मोहक बाह्यसजावटीतून भारताचा सांस्कृतिक वारसा जपण्याची एअर इंडियाची परंपरा कायम ठेवली आहे. समकालीन कलाकार ओशिन शिवा यांच्या मूळ कलाकृतीने वेढलेले ‘व्हीटी-बीडब्लूव्ही’ हे विमान, भारतीय विमान कंपनीच्या ताफ्यातील पहिलेच विमान ठरले आहे.
एअर इंडिया एक्स्प्रेस आता प्रत्येक विमानाच्या मागील भागावर वैविध्यपूर्ण कलाप्रकार प्रदर्शित करून भारताचा सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा वाढवत आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये एअर इंडियाच्या नवीन ब्रँड ओळखीचे औचित्य साधून ‘टेल्स ऑफ इंडिया’ हा उपक्रम सुरू झाला. याअंतर्गत राजा रवी वर्मा यांच्या चित्रांपासून ते राष्ट्रीय वारसा स्मारके आणि कथकली, कथक व भरतनाट्यम यांसारख्या शास्त्रीय कलाप्रकारांच्या रूपांतरांचा समावेश केला. प्रत्येक नवीन विमानाच्या शेपटीवर कलमकारी, बांधणी, कांजीवरम आणि बनारसी यांसारख्या देशी हस्तकला, वस्त्रोद्योग आणि परंपरांपासून प्रेरित एक अद्वितीय कलात्मक डिझाइन पाहायला मिळते.
'द फ्लाइंग कॅनव्हास' हा या सांस्कृतिक डिझाइन तत्त्वज्ञानाचा सर्वात नवीन आणि नाविन्यपूर्ण विस्तार मानला जात आहे. ही सर्जनशीलता आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समकालीन कलाकार ओशिन शिवा यांच्या कल्पनेतून साकारली आहे. वारसा, ओळख आणि भविष्यकाळातील शक्यतांचे मिश्रण करणाऱ्या आपल्या वेगळ्या शैलीसाठी त्या ओळखल्या जातात. एअर इंडिया आणि कोची-मुझिरीस बिनाले यांच्यातील भागीदारीतून हे सहकार्य आकारास आले आहे.
ओशिन शिवा यांच्या मूळ कलाकृतीने सजलेले ‘द फ्लाइंग कॅनव्हास’ हे विमान सांस्कृतिक प्रदर्शन बनले आहे. यामध्ये वंश, ओळख आणि निरंतरतेचे प्रतीक असलेल्या पारंपारिक चिन्हांचा वापर करण्यात आला आहे. संपूर्ण विमानावर समकालीन कला लपेटण्याचा हा भारतातील पहिलाच उपक्रम असून, आकाशात भारतीय संस्कृती साजरी करण्याच्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या वचनबद्धतेला यामुळे एक नवीन आयाम मिळाला आहे.
सखोल संवादाचा पाया रचला
एअर इंडिया एक्स्प्रेसने त्यांच्या एका बोइंग विमानावर खास ‘टेल आर्ट’चे अनावरण केले होते. त्या सहयोगाने भारताच्या समकालीन कला परिसंस्थेशी सखोल संवादाचा पाया रचला होता आणि आता २०२५-२६ च्या आवृत्तीसाठी संपूर्ण विमान कलेने नटवून तो प्रवास सुरू ठेवला आहे.