मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रण हा राष्ट्रीय विक्रम; देशासाठी ‘मुंबई मॉडेल आदर्श’ -आयुक्त

विविध उपाययोजनांमुळे प्रदूषण नियंत्रण हा एक राष्ट्रीय विक्रम असून हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्‍याचे ‘मुंबई मॉडेल’ संपूर्ण देशासाठी आदर्श ठरत आहे
मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रण हा राष्ट्रीय विक्रम; देशासाठी ‘मुंबई मॉडेल आदर्श’ -आयुक्त

मुंबई : मुंबईत सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून यामुळे हवेचा दर्जा उंचावत आहे. विविध उपाययोजनांमुळे प्रदूषण नियंत्रण हा एक राष्ट्रीय विक्रम असून हवा प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्‍याचे ‘मुंबई मॉडेल’ संपूर्ण देशासाठी आदर्श ठरत आहे. सखोल स्वच्छता अभियानामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यात यश येईल, असा विश्वास पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी व्यक्त केला. मुंबईत सखोल स्वच्छता अभियान राबवण्यात येत असून शनिवारी लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मुंबईत सखोल स्वच्छता अभियानाचा शुभारंभ ३ डिसेंबर २०२२ पासून करण्यात आला. पालिकेकडून आता प्रत्येक शनिवारी सर्व विभागात सखोल स्‍वच्‍छता मोहीम राबविण्‍यात येत आहे. रस्ते, पदपथ, लहानसहान गल्लीबोळांमध्ये असलेला घनकचरा तसेच टाकाऊ वस्तू पूर्णपणे काढणे, ब्रशिंग करून रस्ते, पदपथांवरील धूळ काढणे, त्यानंतर रस्ते पाण्याने धुणे ही सर्व कार्यवाही करतानाच रस्‍त्‍यांवर उगवलेली खुरटी झाडीझुडपे समूळ काढणे, अवैध जा‍हिरात फलक हटविणे, कीटकनाशक धूर फवारणी, पावसाळी जाळ्या- गटारे व नाले यांची स्‍वच्‍छता, धोकादायक तारांचे जंजाळ काढणे आदी विविध कामे सखोल स्वच्छता मोहिमेतून करण्यात येत आहेत.

सलग १३ आठवड्यांपासून विविध ठिकाणी सखोल स्‍वच्‍छता मोहीम अविरतपणे सुरू आहे. महामार्ग, हमरस्‍ते, मोठे रस्‍ते यांसह आता लहानसहान रस्‍ते, गल्‍लीबोळ, दाट लोकवस्‍तीतील रस्‍त्‍यांच्‍या स्‍वच्‍छतेवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले आहे. विशेषत: झोपडपट्टी व परिसरातील रस्ते, पायवाटा स्‍वच्‍छतेवर भर देण्‍यात आला आहे.

स्वच्छता मोहिमेची प्रात्यक्षिके!

स्‍वच्‍छता मोहिमेसाठी आलेल्या स्थानिक रहिवाशांशी तसेच शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सार्वजनिक स्‍वच्‍छतेचे महत्त्व चहल यांनी अधोरेखित केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे पथनाट्य सादर करत धारावीकरांचे जनजागरण केले. तर स्वच्छता कशा प्रकारे करणे अपेक्षित आहे, याचे प्रात्यक्षिक देखील त्यांनी नागरिकांना करून दाखवले.

स्वच्छतेसाठी १० दिवसांत वॉर्ड पिंजून काढा!

सखोल स्‍वच्‍छता मोहीम लोकचळवळ बनली आहे. पुढील ९ ते १० आठवड्यांमध्ये प्रशासकीय विभाग (वॉर्ड) स्‍वच्‍छतेकामी पिंजून काढण्‍याचे लक्ष्य आहे.

शनिवारी सकाळी ७.३० वाजेपासून सुरू केलेल्या दौऱ्यात चहल यांनी स्वच्छता मोहिमेत प्रत्‍यक्ष सहभाग देखील घेतला. यावेळी आमदार कॅप्‍टन तमीळ सेल्‍वम, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उप आयुक्‍त (सार्वजनिक आरोग्‍य) संजय कुऱ्हाडे, उप आयुक्‍त (घनकचरा व्‍यवस्‍थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे, उप आयुक्‍त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in