मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना जात नसल्याने विविध चर्चांना सुरूवात झाली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीच अजितदादांच्या या गैरहजेरीचे कारण स्पष्ट केले आहे. अजितदादांना डेंग्यूची लागण झाली असून डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यांची तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतरच ते त्यांचे दैनंदिन कार्यक्रम सुरू करतील, असे प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवरून स्पष्ट केले आहे.
अजितदादा गेल्या दोन तीन दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याचे दिसत नव्हते. त्यामुळे विविध चर्चांना सुरूवात झाली. राज्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाने जोर पकडला आहे. नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे अजितदादा बाहेर पडत नाहीत. तसेच अजितदादा सरकारमध्ये नाराज आहेत, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याला कारणही तसेच होते. कारण काही दिवसांपुर्वी पालकमंत्रीपदाची घोषणा होत नसल्याने अजितदादा खरोखरच नाराज होते. कॅबिनेट बैठकीलाही ते अनुपस्थित राहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तत्काळ दिल्लीला गेले होते आणि त्यानंतर पालकमंत्रीपदाची घोषणा झाली होती. त्यामुळे यावेळच्या दादांच्या नाराजीचे कारण काय अशा चर्चा सुरू होत्या.
मात्र, प्रफुल्ल पटेल यांनी एक्सवरून अजितदादा हे डेंग्यूने आजारी आहेत. डॉक्टरांनी त्यांना काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी उगाचच वेगवेगळ्या बातम्या पसरवू नये, असे स्पष्ट केले. त्यामुळे अजितदादा हे आजारी असल्याने कार्यक्रमांना उपस्थित राहत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अजितदादा पूर्ण बरे झाल्यानंतर ते त्यांचे दैनंदिन कार्यक्रम पुन्हा सुरू करतील.