राष्ट्रवादीत संभ्रम कायम आमदारांसह अजितदादा सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्या भेटीला!

शरद पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला उपस्थित आहेत हे समजल्यावर प्रत्येक आमदारांनी त्यांचे आशीर्वाद घेतले
राष्ट्रवादीत संभ्रम कायम आमदारांसह अजितदादा सलग दुसऱ्या दिवशी शरद पवारांच्या भेटीला!
Published on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या या अचानक भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. शरद पवार यांनी मात्र याबाबत अद्यापही जाहीरपणे त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. पक्ष एकसंध राहावा यादिशेने शरद पवार यांनी विचार करावा, अशी विनंती आम्ही केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी रविवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे शरद पवार यांची भेट घेतली होती. आशीर्वाद घेण्यासाठी तसेच पक्ष एकसंध राहावा यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती करण्यासाठी ही भेट होती. अधिवेशन सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी पुन्हा आपल्या आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे गेले. शरद पवार यांना या भेटीची कल्पना नव्हती. सलग दुसऱ्या दिवशी अजित पवार, त्यांच्या सोबतचे मंत्री आणि आमदार शरद पवारांना भेटायला गेल्याने विविध चर्चा सुरू झाल्या, मात्र शरद पवार यांनी दुसऱ्या दिवशीही या भेटीबाबत आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सुनील तटकरे आणि मी रविवारी शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला गेलो होतो. रविवारी सगळे आमदार आपापल्या मतदारसंघात होते. सोमवारी विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले असून, बरेच आमदार उपस्थित झाले. त्यामुळे शरद पवार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला उपस्थित आहेत हे समजल्यावर त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले आणि प्रत्येक आमदारांनी त्यांचे आशीर्वाद घेतले, असेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. रविवारी शरद पवार यांनी जसं आमचं ऐकून घेतलं तसं आजही ऐकून घेतलं. त्यांच्या मनात काय आहे हे मी कसे सांगू शकतो, मात्र आमचं म्हणणं ऐकून घेतलं हेही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in