
मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत बदलाचे वारे वाहू लागले आहेत. सर्वपक्षीय नेत्यांनी मुंबई महापालिकेवर फोकस केला असून समन्वयक, पदाधिकारी आदींची नव्याने नियुक्ती करण्यात येत आहे. मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला ९ महिने उलटले तरी मुंबई अध्यक्षाच्या नावाची घोषणा करण्यास मुहूर्त सापडलेला नाही.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांनी कंबर कसली आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी असो, वा अजित पवार यांची राष्ट्रवादी दोन्ही राष्ट्रवादींची तशी मुंबईत पकड सैलच आहे. मात्र मुंबई महापालिका निवडणुका लक्षात घेता मुंबई अध्यक्ष पदाच्या नावाची घोषणा होणे अपेक्षित असल्याचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.
दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची वर्णी लागली आहे. मात्र शरद पवारांच्या पक्षातून वेगळ्या झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई अध्यक्षाचा शोध असल्याने अद्याप कोणावरही जबाबदारी निश्चित करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.
समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा
विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष म्हणून समीर भुजबळ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र विधान सभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष पद रिक्त आहे. समीर भुजबळ यांनी याआधी मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी पार पाडली आहे. त्यात त्यांचे वडिल छगन भुजबळ यांची अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदी नुकतीच वर्णी लागली आहे. त्यामुळे समीर भुजबळ यांच्याकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात येईल, असे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याने सांगितले.