"पदवीचा प्रश्न महत्त्वाचा नाही, तर..." त्या प्रश्नांवर का संतापले अजित पवार?

पंतप्रधानांच्या पदवी वादावर राष्ट्रवादीचे अजित पवारांनी भूमिका मांडताना केले मोदींचे कौतुक, तसेच सभेत उद्धव ठाकरेंना वेगळी खुर्ची का? याचेही दिले स्पष्टीकरण
"पदवीचा प्रश्न महत्त्वाचा नाही, तर..." त्या प्रश्नांवर का संतापले अजित पवार?

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीवरून चांगलाच वाद रंगला आहे. काही दिवसांपूर्वी गुजरात उच्चं न्यायालयाने पंतप्रधान मोदींच्या पदवीची माहिती देण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठोठावला होता. यावरून काल महाविकास आघाडीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनीही यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. तसेच, आज संजय राऊत यांनी ट्विट करत टोला लगावला होता. याबद्दल अजित पवारांना विचारले असता त्यांनी मात्र याबाबत आपली वेगळी भूमिका मांडली.

पंतप्रधान मोदींच्या पदवीवर सुरु असलेल्या टिकेवरून अजित पवार म्हणाले की, "देशातील जनतेने पदवी बघून नाही, तर करिश्मा बघून मोदींना पंतप्रधान केले आहे. गेली ९ वर्ष देशाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याच्या पदवीचा वाद का उकरला जात आहे? हा विषय महत्त्वाचा आहे का?" असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, "मंत्र्यांचा पदव्यांचा प्रश्न महत्त्वाचा नाही तर, महागाई व बेरोजगारीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. महागाईचा आगडोंब उसळलेला असून त्याबद्दल बोलायचे नसते, चर्चा करायची नसते. आम्हाला नोकरी कधी मिळणार? असे प्रश्न बेरोजगार तरुण-तरुणी विचहरात आहेत. वेगवेगळ्या विभागांमध्ये तब्बल ७५ हजार जणांची भरती होणार होती, त्याच नेमकं काय झालं? शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न आहेत." असे मत त्यांनी व्यक्त केले.

तसेच अजित पवारांना विचारण्यात आले की, उद्धव ठाकरेंना सर्वांपेक्षा वेगळी खुर्ची का दिली होती? यावर त्यांनी स्पष्टीकरत देताना म्हंटले की, "उध्दव ठाकरेंना पाठीचा त्रास असल्यामुळे त्यांना वेगळी खुर्ची दिली होती." पुढे ते नाराजीच्या बातम्यांवर म्हणाले की, "महाविकास आघाडीच्या प्रत्येक सभेला सगळेच उपस्थित राहतील, असे अजिबात नाही. प्रत्येक सभेमध्ये प्रत्येक पक्षाचे २ -२ नेते बोलावले जाणार आहे, असे धोरणच आम्ही स्वीकारले आहे. सभेत गैरहजेरी म्हणजे नाराजी असे अजिबात काही नाही, याची नोंद माध्यमांनी घ्यावी." असे आवाहन त्यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in