
आज अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. मात्र, या अर्थसंकल्पावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या अर्थसंकल्पाला शिंदे फडणवीस सरकारचा चुनावी जुमला असल्याचे म्हणत जोरदार टीका केली. ते म्हणाले की, "हा अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांचे इमले, शब्दांचे फुलोरे आणि घोषणांचा सुकाळ असणारा आहे."
अर्थसंकल्प सादर केल्यानंतर प्रसार माध्यमांशी सवांद साधताना अजित पवार म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस जेव्हा अर्थसंकल्प सादर करत होते, तेव्हा मला १४ मार्चचा निकाल डोळ्यासमोर आला. सत्तासंघर्षाचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल १४ मार्च रोजी लागणार आहे. हा निकाल विरोधात जाणार हे सत्ताधाऱ्यांना कळले असल्यामुळे आता अर्थसंकल्पात एवढ्या घोषणा केल्या. याशिवाय पदवीधर निवडणुकीमध्ये बसलेला धक्का आणि पोटनिवडणुकीतील पराभव यामुळे अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा केल्या आहेत. उद्धव ठाकरेंच्या सभेला तुफान गर्दी आणि यांच्या सभेला खुर्च्या रिकाम्या, हे बघून सत्ताधारी गडबडले आहेत. त्यामुळे होत, नव्हते ते जाहीर करून टाका, पुढचे पुढे बघू, असा हा अर्थसंकल्प होता," असे म्हणत त्यांनी जोरदार टीका केली.