Ajit Pawar : चहात काय सोन्याचं पाणी टाकता का? अजित पवारांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी महाराष्ट्र अधिवेशनाआधी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली शिंदे- फडणवीस सरकारवर टीका
Ajit Pawar : चहात काय सोन्याचं पाणी टाकता का? अजित पवारांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

उद्यापासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार आहे. मात्र, हे अधिवेशन वादळी ठरणार असल्याचे संकेत आता विरोधीपक्ष नेत्यांनी दिली आहे. विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) शासकीय निवासस्थानी सुरु असलेल्या खर्चावर ताशेरे ओढताना म्हणाले की, "एकीकडे राज्याचा तरुण, शेतकरी संकटात असताना हे राज्य सरकार स्वतःचे हसरे चेहरे दाखवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्याच्या खानपानाचे बिल हे तब्बल २ कोटी ३८ लाख आले. हे लोक चहामध्ये काय सोन्याचं पाणी टाकून देतात का? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला आहे.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ते पुढे म्हणाले की, "स्वतःचे हसरे फोटो दाखवण्यासाठी जाहिरातींवर कोट्यावधीचा खर्च सुरु आहे. सरकार सपशेल अपयशी ठरले असून तिजोरीचा विचार न करता निव्वळ मंत्री आणि त्यांचे ठराविक आमदाराच्या मतदारसंघात करोडो रुपयांची कामे जाहीर करतात. पण, त्यांच्याकडे इतका निधीच नाही. ही एक फसवणुक असून इतर गोष्टींवर उधळपट्टी सुरु आहे." असा घणाघात त्यांनी केला.

"गेल्या ८ महिन्यात जाहिरातींवर सरकारकडून ५० कोटी खर्च करण्यात आलेला आहे. मुंबई महापालिकेकडून माहिती घेतली तर तिथून १७ कोटींपेक्षा अधिक खर्च जाहिरातींवर करण्यात आला आहे. विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मागे मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आल्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत." असा आरोप केला. तसेच, विरोधी पक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चहापानावर बहिष्कार टाकला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in