Ajit Pawar Plane Crash : पोलिसांना 'एफआयआर' का नको? - राज ठाकरे

'दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेचा विषय हा कोणत्याही राजकारणाच्या पलीकडचा असून तो महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. अजित पवार धुक्यामुळे गेले की धोक्याने, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. जनतेच्या मनात पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय असून याप्रकरणी सरकारच संशयाची भुते नाचवत असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केला.
Ajit Pawar Plane Crash : पोलिसांना 'एफआयआर' का नको? - राज ठाकरे
Published on

'दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान दुर्घटनेचा विषय हा कोणत्याही राजकारणाच्या पलीकडचा असून तो महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवी आहे. अजित पवार धुक्यामुळे गेले की धोक्याने, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. जनतेच्या मनात पवार यांच्या अपघाती मृत्यूबाबत संशय असून याप्रकरणी सरकारच संशयाची भुते नाचवत असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी येथे केला. तसेच हा केवळ अपघात असेल आणि घातपात नसेल तर याप्रकरणी तक्रार नोंदवायला सरकारकडून अडथळे का आणले जात आहेत? त्यामुळेच काहीतरी काळंबेरं आहे, असा संशय निर्माण होत असल्याचेही ठाकरे म्हणाले. रोहित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शुक्रवारी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे यांनी सरकारवर प्रश्नांच्या फैरी झाडल्या.

‘एफआयआर’ नोंदविताना सरकारकडूनच अडथळे...

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूप्रकरणी रोहित पवार यांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी ‘एफआयआर’ नोंदविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिन्ही ठिकाणी सरकारकडून अडथळे आणले गेले. मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवला जात असताना, तेथील पोलीस उपायुक्तांनी तो लिहून न घेण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे सरकार किंवा पोलीस यंत्रणेला हा ‘एफआयआर’ का नको आहे? अजित पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याच्या मृत्यू प्रकरणात ‘एफआयआर’ नोंदवला जात नसेल, तर सर्वसामान्य माणसाचे काय? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच एफआयआर नोंदवल्यानंतर त्यानुसार चौकशी करणे अतिशय सोपे आहे. मात्र, सरकार पोलिसांवर दबाव टाकत असल्यामुळेच या प्रकरणाबाबत संशय निर्माण होत आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट बोलावे...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अजित पवार हे त्यांचे पती होते आणि त्यांच्याच पतीच्या अपघातासंदर्भात हा ‘एफआयआर’ आहे. त्यामुळे सुनेत्रा पवार यांनी या विषयावर स्पष्ट भूमिका मांडावी. तसेच मुख्यमंत्र्यांनी तर बोलले पाहिजे, असे म्हणत राज ठाकरेंनी रोहित पवारांची भक्कमपणे बाजू घेतली. रोहित पवार यांनी हा प्रश्न विधिमंडळ अधिवेशनात मांडावा आणि राष्ट्रवादीच्या खासदारांनी लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करावा, असा सल्ला आपण दिल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in