

मुंबई : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सोमवारी पार पडला. हा कार्यक्रम पुण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार होता. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत तसा उल्लेख होता. परंतु, या इमारतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि प्रथम सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव असल्यामुळे अजित पवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा जपल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर स्थापन झालेल्या भाजप-शिवसेना सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाले. पक्षाच्या विचारधारेशी कोणतीही तडजोड न करता विकासाच्या मुद्द्यावर महायुती सरकारमध्ये सामील झाल्याचे अजित पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते. महायुतीमध्ये अजित पवार भाजपसोबत आहेत. भाजप नेत्यासोबत ते सरकारच्या शासकीय कार्यक्रमात ते उपस्थित राहतात. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुठल्याही व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार कधीच दिसत नाहीत, किंबहुना संघाशी संबंधीत कार्यक्रमाला देखील ते हजेरी लावत नाहीत, हे मागील अडीच वर्षात अनेकदा दिसून आलेले आहे.