अजित पवार-सुप्रिया सुळेंची भाऊबीज राजकीय दुरावा, मात्र कौटुंबिक जिव्हाळा कायम

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार स्वतंत्र गट स्थापन करीत महायुतीत सामिल झाले होते

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्याने पवार घराण्यातील वाद उफाळून येतो की काय, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यात पक्षातून बाहेर पडताच अजित पवार यांनी आक्रमक भाषण केले होते. त्यामुळे कौटुंबिक अंतरही पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तसेच यंदाची कौटुंबिक दिवाळी कशी साजरी होणार, असाही प्रश्न उपस्थित होत होता. परंतु दरवर्षीप्रमाणेच पवार कुटुंबात यंदाचीही दिवाळी साजरी झाली. सर्व पवार कुटुंबीयांनी एकत्रित स्नेहभोजन घेतले. तसेच खा. सुप्रिया सुळे आणि त्यांच्या भगिनींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली. त्यामुळे भलेही अलीकडे राजकीय दुरावा निर्माण झाला. मात्र, दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्यात कौटुंबिक जिव्हाळा पाहायला मिळाला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार स्वतंत्र गट स्थापन करीत महायुतीत सामिल झाले होते. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्रित येणार का, असा प्रश्न उपस्थित केला होता. एवढेच नव्हे, तर पवार कुटुंबीयांची दिवाळी दरवर्षी एकत्रित साजरी होते. यंदा एकत्रित साजरी होणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, दिवाळीत पवार कुटुंबीयांचे मनोमिलन सर्वांना पाहायला मिळाले. कारण पवार कुटुंबीयांनी विविध ठिकाणी एकत्रित येत स्नेहभोजनाचा आनंद घेतला आणि त्यानंतर भाऊबिजेच्या दिवशी पवार कुटुंबीय काटेवाडी (ता. बारामती) येथे एकत्र आले. यावेळी खा. सुप्रिया सुळे यांनी आपल्या सर्व भगिनींसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. त्यामुळे पवार कुटुंबीयांत राजकीय दुरावा निर्माण झाला असला, तरी कौटुंबिक स्नेह कायम दिसून आला. पवार कुटुंबीय या अगोदर अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्याही निवासस्थानी एकत्रित आले होते. तसेच दिवाळी पाडव्यानिमित्त शरद पवार यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने आले होते. त्यावेळी अजित पवार यांची अनुपस्थिती होती. मात्र, ते आपल्या काटेवाडीत होते. त्यांनीही पवार कुटुंबीयांत दुरावा असल्याचे जाणवू दिले नाही. उलट अजित पवार यांच्या निवासस्थानी शरद पवारांसह सर्व कुटुंबीयांनी हजेरी लावली आणि दिवाळीच्या स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

मुंडे कुटुंबीयांचीही भाऊबीज

एकीकडे पवार कुटुंबीयांत दिवाळी आनंदात साजरी होत असतानाच मुंडे कुटुंबीयांच्या दिवाळीकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष असते. कारण मुंडे कुटुंबीयांत टोकाचा वाद होता. मात्र, अलीकडे तो दुरावा कमी होताना दिसत आहे. त्यातच भाऊबिजेच्या दिवशी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचे औक्षण केले. यातून मुंडे कुटुंबीयांतील नातेसंबंधही मजबूत असल्याचा संदेश देण्यात आला.

logo
marathi.freepressjournal.in