अजित पवारांचा माफीनामा;पीएच.डी.संबंधीच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी

एच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसंबंधी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करीत २०० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळते
अजित पवारांचा माफीनामा;पीएच.डी.संबंधीच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी
@ANI

नागपूर : पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांसंबंधी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करीत २०० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती मिळते, ही संख्या वाढवावी, असे म्हटले होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पीएच.डी. करून काय दिवे लावणार, असा प्रतिप्रश्न करून यासंबंधीच्या प्रश्नाला बगल दिली होती. त्यावरून विरोधकांसह विद्यार्थीही आक्रमक झाले होते. एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांनी २०२४ मध्ये तुमचे दिवे लावू, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त करीत सारवासारव केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माफीनामा ठरलेले समीकरण आहे. बोलण्याच्या ओघात काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करायचे आणि त्यानंतर माफी मागून मोकळे व्हायचे, अशी त्यांची पद्धत रूढ झाली आहे. त्याचीच प्रचिती गुरुवारी पुन्हा आली. बुधवारी झालेली टीका आणि विद्यार्थ्यांनी निषेध नोंदविल्यानंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त करीत वादग्रस्त वक्तव्याबाबत सारवासारव केली.

यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, काल विधान परिषदेत बोलताना माझ्या तोंडातून पीएच.डी. करून काय दिवा लावणार, असा शब्द गेला. याबाबत राज्यात गाजावाजा झाला. पण मी त्यासंदर्भात दिलगिरी व्यक्त करतो. राज्यात अनेकांनी पीएच.डी. केली आहे. याबाबत आपले कसल्याही प्रकारचे दुमत असण्याचे कारण नाही. परंतु पीएच.डी. निवडीसाठी एक समिती नेमली जावी, असे माझे मत आहे. यासंदर्भात पवार यांनी आता सारवासारव केल्याने तूर्त हा विषय मागे पडला. परंतु या वक्तव्याचा राग पीएच.डी. करणाऱ्या तरुणांच्या मनात कायम राहणार आहे. अगोदरच तरुणांमध्ये नोकरभरतीबाबत रोष आहे. त्यातच अशी वक्तव्ये केली जात असल्याने सरकारला तरुणाईच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in