अजितदादा गट लागला लोकसभेच्या तयारीला

मंत्र्यांचे मतदारसंघ निहाय दौऱ्यांचे नियोजन
अजितदादा गट लागला लोकसभेच्या तयारीला

मुंबई : आगामी वर्ष हे निवडणुकांचे असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा उपमुख्यमंत्री अजित पवार गट आतापासूनच या निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. पुढच्या पाच ते सहा महिन्यांनंतर लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे वारे वहायला लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते लोकसभा मतदारसंघनिहाय राज्याचा दौरा करणार असून, पक्ष कार्यालयात नऊ मंत्र्यांचा जनतादरबार भरवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली. स्वत: सुनील तटकरे देखील राज्याचा दौरा करणार आहेत.

अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या ध्येयधोरणांवर चर्चा झाल्याचे सांगून सुनील तटकरे म्हणाले, बैठकीत पक्षाची ध्येयधोरणे, राज्यव्यापी संघटना यावर चर्चा केली. पुढच्या आठवड्यात कोअर ग्रुपची बैठक होणार आहे. पक्षाचा कालबद्ध कार्यक्रम ठरविणार आहोत. मी स्वत: राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. राज्यात नऊ मंत्री आहेत. त्यांचा जनतादरबार सुरू करणार असल्याचे तटकरे म्हणाले.

पुढच्या पाच ते सहा महिन्यांनंतर लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराचे वारे वहायला सुरुवात होणार आहे. त्यामुळे अजितदादा गट आतापासूनच निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर दादा गटाला लोकसभा निवडणुका या अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. भाजपला परफॉर्मन्स करून दाखवावा लागणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in