अजितदादांना मोठा धक्का; संजोग वाघेरे मातोश्रीवर !

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीत संजोग वाघेरे यांचा मोठा दबदबा आहे. त्यांचे वडील देखील राष्ट्रवादीमध्ये होते.
अजितदादांना मोठा धक्का; संजोग वाघेरे मातोश्रीवर !
PM

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक संजोग वाघेरे यांनी सोमवारी थेट 'मातोश्री'वर जाऊन शिवसेना (उबाटा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. लोकसभा निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, त्यामुळे या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. दोन वेळा तयारी करूनही संजोग वाघेरे यांना अजित पवार यांनी लोकसभेला संधी दिली नाही, त्यामुळे यावेळी आधीच सावध होत त्यांनी मातोश्रीचे दार ठोठावले आहे. उद्धव यांनी संजोग वाघेरे यांना पक्षात स्थान दिल्यास अजित पवारांसाठी मोठा धक्का ठरणार आहे.

पिंपरी चिंचवड राष्ट्रवादीत संजोग वाघेरे यांचा मोठा दबदबा आहे. त्यांचे वडील देखील राष्ट्रवादीमध्ये होते. शरद पवार यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते. अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेत भाजपसोबत सत्तेत सामील झाल्यानंतर संजोग वाघेरे सुरूवातीला शरद पवार यांच्यासोबत राहिले. मात्र  पुढील राजकीय समीकरणे लक्षात घेत ते अजितदादांसोबत आले. ते मात्र मावळ लोकसभा मतदार संघातून इच्छुक आहेत. मात्र येथण त्यांना उमेदवारी मिळण्याच्या शक्यता धूसर दिसू लागताच त्यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

सदिच्छा भेट, अद्याप प्रवेश नाही!

उद्धव ठाकरे यांची सोमवारी मातोश्री वर झालेली भेट सदिच्छा होती, असा दावा संजोग वाघेरे यांनी केला. मावळ लोकसभा लढविण्यासाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट करत त्याच अनुषंगाने आपण उद्धव ठाकरे यांना भेटल्याचे त्यांनी सांगितले. गेली दोन टर्म मी लोकसभेची तयारी करतो आहे. पण मला लोकसभेची संधी दिली गेली नाही. यंदा मला लोकसभेसाठी संधी मिळावी अशी अपेक्षा आपण उद्धव ठाकरे यांचेकडे व्यक्त केली आहे. मी अद्याप प्रवेश केला नाही. त्यावर ठाकरे यांनी दोन दिवसांचा वेळ मागितला असून त्यांचा निर्णय आल्यानंतर पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे वाघेरे यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in