शरद पवार सोबत आले तरच अजितदादा मुख्यमंत्री!

शरद पवार सोबत आले तरच अजितदादा मुख्यमंत्री!

विजय वडेट्टीवार यांचा दावा

मुंबई : शरद पवार सोबत आले तरच अजित पवारांना मुख्यमंत्री होता येईल. अन्यथा, त्यांना मुख्यमंत्री होता येणार नाही, अशी अट भाजपने घातली आहे, असा खळबळजनक दावा काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. असे असले तरी शरद पवार आघाडीच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलणार नाहीत, असा विश्वासही वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे नवीन राजकीय चर्चेला ऊत आला आहे. वडेट्टीवारांचा दावा मात्र ठाकरे आणि शरद पवार गटाने फेटाळून लावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुण्यातील गुप्त भेटीमुळे मोठी खळबळ उडाली आहे. या भेटीमुळे महाविकास आघाडीमध्ये संभ्रम वाढून बिघाडीची शक्यता वर्तविण्यात येत होती. भेटीसंदर्भात स्वत: शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असतानाच प्रसार माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. वडेट्टीवार म्हणाले, ‘‘या भेटीमुळे संभ्रम झाला, असे म्हणण्याचे काही कारण नाही. ते काका-पुतणे आहेत. त्यामुळे शरद पवार त्यांची भूमिका स्पष्ट करतील, त्यासाठी सर्वांनी धीर धरला पाहिजे, असे सांगत या भेटीत कोणाची तरी गरज आहे. ही गरज जो भेटायला जातो, त्याची असते. त्यामुळे अजित पवारांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर शरद पवारांना बरोबर घ्यावेच लागेल. पण पवार त्यांच्यासोबत आले नाहीत तर अजित पवारांना केवळ मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बघत राहावे लागेल, असे कदाचित भाजपने म्हटले असेल. म्हणूनच हा सत्तेसाठी सुरू असलेला खटाटोप असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

अजित पवार भेटले म्हणून शरद पवार यांच्या भूमिकेत काही बदल होईल, अशी शक्यता वाटत नाही. आघाडीच्या विरोधात ते कोणतेही पाऊल उचलणार नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले. १ तारखेला इंडियाच्या बैठकीत ते आपली भूमिका स्पष्ट करतील, असे सांगतानाच आमचा बी प्लान म्हणण्यापेक्षा निवडणुकीच्या तयारीसाठी राजकीय पक्ष तयारी करत असतात. निवडणुकीपासून कोणी दूर जाऊ शकत नाही. ठाकरेंची आणि भाजपनेही लोकसभा मतदारसंघात चाचपणी करायला सुरुवात केली आहे. शिंदे गटानेही मध्यंतरी चाचपणी केली होती. आता अजित पवार गटही करत आहे. या चाचपण्या म्हणजे पक्षाला कुठे अनुकूल वातावरण आहे, हे बघण्यासाठी असतात. जेथे जिंकण्याची आशा आहे, तेथे कार्यकर्ता मजबूत आहे का आणि पक्षाची स्थिती भक्कम आहे का, हे सर्व बघून निर्णय घ्यावा लागतो, असेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

वडेट्टीवारांच्या वक्तव्याविषयी अजित पवार गटाचे नेते व वैद्यकिय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारले असता ते म्हणाले, शरद पवार यांनी आमच्यासोबत यावेत, ही आमची इच्छा आहे. आम्ही त्यांना भेटून साकडेही घातले आहे. आमचे एकच कुटुंब आहे, राष्ट्रवादी काँग्रेस एकच आहे. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. सरकारला डबल इंजिन लावल्यामुळे अधिक वेगाने विकास होत आहे, असेही मुश्रीफ म्हणाले.

पवारांना कोण ऑफर देऊ शकतो?

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी, विजय वडेट्टीवार यांचा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे. ‘‘शरद पवारांना कोणी ऑफर देऊ शकतो, हा म्हणजे या वर्षातील सर्वात मोठा जोक आहे. पवारांची उंची किती, त्यांची लोकसभेतील कारकीर्द किती आणि त्यांना कोण ऑफर देणार, असा सवाल करत जे कोणी काय बोलतात, ते बोलू देत. पवारांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मी कुठेही जाणार नाही. मी जातीयवादी पक्षाची हात मिळवणार नाही. मी पुरोगामी विचारांचा पुरस्ककर्ता आहे. मी तेच विचार पुढे घेऊन जाणार आहे, असेही आव्हाड म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in