‘आकांक्षी शौचालया’वरून वादंग; बांधकाम सुरू केल्याचा मकरंद नार्वेकरांचा आरोप; काम स्थगित असल्याचा पालिकेचा दावा

दक्षिण मुंबईत ‘आकांक्षी शौचालये’ बांधण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने स्थगितीचा आदेश दिला होता, तरीही पालिकेने लायन गेटसमोर शौचालय बांधकाम पुन्हा सुरू केल्याची माहिती माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दिली.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : दक्षिण मुंबईत ‘आकांक्षी शौचालये’ बांधण्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र सरकारने स्थगितीचा आदेश दिला होता, तरीही पालिकेने लायन गेटसमोर शौचालय बांधकाम पुन्हा सुरू केल्याची माहिती माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दिली. याविषयी त्यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून राज्य सरकारच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर दुसरीकडे महापालिकेकडून राज्य शासनाच्या निर्देशानुसार आकांक्षी शौचालयांचे बांधकाम अद्यापही स्थगितच असल्याचा दावा केला आहे.

विधानसभेत मुंबई भाजपचे अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर मंत्री उदय सामंत यांनी चौकशी होईपर्यंत दक्षिण मुंबईतील १४ आकांक्षी शौचालयांची कामे स्थगित करण्यात येतील, अशी घोषणा सभागृहात केली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत काम स्थगित करण्याचे सरकारने आदेश दिले असले तरी त्या ठिकाणी महापालिकेने पुन्हा बांधकाम सुरू केल्याची माहिती माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी दिली.

मकरंद नार्वेकर हे गेल्या अनेक महिन्यांपासून ‘ए’ वॉर्डमध्ये, विशेषतः फुटपाथवर बांधल्या जाणाऱ्या आकांक्षी शौचालयांच्या बांधकामाला विरोध करत आहेत. अशा बांधकामांमुळे पादचाऱ्यांच्या जागेवर अतिक्रमण होते आणि पालिकेच्या 'पादचारी प्रथम' या धोरणाचे उल्लंघन होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. या धोरणानुसार किमान १.२ मीटर रुंदीचा विना अडथळा मार्ग पादचाऱ्यांसाठी अनिवार्य आहे, असे त्यांनी अधोरेखित करून हा मुद्दा उपस्थित केला आहे.

लायन गेट शौचालयाच्या बाबतीत, फुटपाथ ८.६५ मीटर रुंद आहे, तरीही पादचाऱ्यांच्या सुरक्षित हालचालीसाठी जागा सोडण्यात आलेली नाही. सध्याच्या डिझाइनमुळे लोकांना रस्त्यावरून चालण्यास भाग पाडले जात आहे. त्यामुळे नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येत आहे असेही नार्वेकर म्हणाले.

लायन गेट येथील प्रस्तावित आकांक्षी शौचालयाच्या ठिकाणालगतहून बेस्टच्या केबल जातात. मात्र, या केबलमध्ये दोष निर्माण झाल्यामुळे सदर दोष दुरुस्त होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने, सदर ठिकाणी गत २-३ दिवसांपासून बेस्ट प्रशासनाकडून केबल दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे सध्या समाज माध्यमातून आणि प्रसारमाध्यमातून प्रसारित होणाऱ्या बातम्या निराधार असल्याचे स्पष्टीकरण पालिकेने दिले आहे.

पालिकेचे स्पष्टीकरण

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान-२ च्या मार्गदर्शक तत्वानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेने लायन गेट येथे आकांक्षी शौचालय प्रस्तावित केले आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष यांनी १७ जुलै २०२५ रोजी दिलेल्या निर्देशानुसार, लायन गेट येथील शौचालयाचे बांधकाम बंद ठेवण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in