अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण : ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंगसह इतर कागदपत्रे सुपूर्द करा; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश

ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंगसह इतर कागदपत्रे याचिकाकर्त्यांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश खंडपीठाने पोलिसांना दिले.
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरण : ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंगसह इतर कागदपत्रे सुपूर्द करा; उच्च न्यायालयाचे पोलिसांना निर्देश
Published on

मुंबई : अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेली कागदपत्रे मिळावी यासाठी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या मध्यस्थी याचिकेची न्या. रेवती मोहिते डेरे यांच्या खंडपीठाने शुक्रवारी दखल घेतली. ऑडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंगसह इतर कागदपत्रे याचिकाकर्त्यांकडे सुपूर्द करण्याचे निर्देश खंडपीठाने पोलिसांना दिले.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांकडून एन्काऊंटर करण्यात आला. अक्षयने एका पोलीस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्व्हर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी घुसून तो जागीच ठार झाला. या एन्काऊंटर प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अक्षयच्या वडिलांनी उच्च न्यायालयात केली होती. या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे, पंचनामा व इतर दस्तावेज मिळावा यासाठी उच्च न्यायालयात शुक्रवारी मध्यस्थी याचिका करण्यात आली होती.

या याचिकेवर न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सत्र न्यायालयात याप्रकरणी उद्यापासून सुनावणी सुरू होणार असल्याने कागदपत्रे मिळावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली. न्यायालयाने याची दखल घेत सरकारी वकील हितेन वेनेगावकर यांना सदर कागदपत्रे देण्यास सांगितले व मध्यस्थी याचिका निकाली काढली.

logo
marathi.freepressjournal.in