

मुंबई : मुंबईतील जुन्या चित्रपटगृहांच्या वैभवशाली इतिहासाची आणखी एक खूण पुसली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भायखळ्यातील सुमारे १०० वर्षे जुने आणि गेल्या २० वर्षांपासून बंद असलेले अलेक्झांड्रा सिनेमागृह लवकरच इतिहासजमा होण्याची शक्यता आहे. या सिनेमागृहाच्या भूखंडावरील विद्यमान चित्रपटगृह आरक्षण रद्द करून तो भूखंड रहिवासी, निवासी वापर क्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. येत्या बुधवारी होणाऱ्या सुधार समितीच्या बैठकीत या प्रस्तावावरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
भायखळ्यातील भूखंड क्रमांक ३३१ वर असलेले अलेक्झांड्रा सिनेमागृह २००७ पासून बंद आहे. इमारत अत्यंत जीर्ण व मोडकळीस आलेली असून दिवसेंदिवस तिची अवस्था खराब होत आहे. बदलत्या मनोरंजन क्षेत्रामुळे तसेच सध्याच्या परिस्थितीत चित्रपटगृह चालवणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचा दावा करण्यात आला आहे. या चित्रपटगृहाचा परवाना २००७ पर्यंत नूतनीकरण करण्यात आला होता.
अनेक डब चित्रपटांचे माहेरघर
अलेक्झांड्रा सिनेमागृहाचा भूखंड १००५.०३ चौरस मीटर आहे. शंभर वर्षांहून अधिक जुन्या या चित्रपटगृहात हिंदी, इंग्रजी व डब केलेले चित्रपट प्रदर्शित होत होते.
अंधेरीतील दोन आरक्षणांमध्येही बदल
अंधेरी-वर्सोवा येथील मंजूर डीपीमधील पालिका चौकी, अग्निशमन केंद्र व इतर आरक्षणे वगळून हा भूखंड निवासी क्षेत्रात तसेच अंधेरी-आंबिवली येथील श्रीमदभारत मंडळीच्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या भूखंडावर असलेले बगीचा व उद्यान आरक्षण रद्द करण्याचा प्रस्ताव आहे.