मालवणीतील हत्येतील पाचही आरोपींना अटक

हत्येनंतर काही तासांत पाचही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.
मालवणीतील हत्येतील पाचही आरोपींना अटक

मुंबई : पूर्ववैमस्नातून झालेल्या इजाज अब्दुल बशीर शेख याच्या हत्येतील पाचही आरोपींना गुन्हा दाखल होताच मालवणी आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. या पाच जणांमध्ये मन्सूर सय्यद अफसर अली ऊर्फ शेट्टी, साबीर बाबू अन्सारी, अकबर अमीन हसन अन्सारी, रेश्मा मन्सूर सय्यद, यास्मीन तौहीन खान यांचा समावेश आहे. या गुन्ह्यांत इतर तिघांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

मृत इजाज शेख हा मालवणीतील उस्मानिया मशिदीजवळील अंबुजवाडी, सुहागनबाबा टेकडी परिसरात राहतो. त्याच्याच शेजारी राहणाऱ्या मन्सूर सय्यद यांच्या कुटुंबामध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होत होता. याच वादातून बुधवारी दुपारी तीन वाजता मन्सूर, त्याची पत्नी रेश्मा, मुलगा नावेद व इतर आरोपींनी इजाज शेख याला लोखंडी पाईप, पेव्हर ब्लॉक, सळईसह लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत इजाज याचा कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये नेताच मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच रेश्मासह इतर यास्मीन, साबीर आणि अकबर या चौघांना मालवणी पोलिसांनी तर कटाचा मुख्य सूत्रधार मन्सूर अली याला कांदिवली गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. मन्सूर व त्याच्या कुटुंबियांची मालवणी परिसरात प्रचंड दहशत आहे. त्यांच्या दशहतीमुळेच त्यांच्याविरुद्ध कोणीही पोलिसात तक्रार करत नव्हता. त्यातच त्यांचे इजाज शेखसोबत गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होते. हे वाद विकोपास गेल्याने या आठ जणांनी त्याची बुधवारी हत्या केली होती. मात्र हत्येनंतर काही तासांत पाचही आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले.

logo
marathi.freepressjournal.in