स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन

२२९ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन; २ हजार ५१५ चालकांवर कारवाई
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन

मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर शनिवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी अचानक ‘ऑल आऊट ऑपरेशन’ मोहीम हाती घेऊन ३५५ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. शहरात एकूण २ हजार २९० ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले तर ७ हजार ७६८ वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी २ हजार ५१५ वाहनचालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली.

मंगळवारी स्वातंत्रदिन असल्याने शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शनिवारी रात्री मुंबई पोलिसांनी रात्री ११ वाजता अचानक ‘ऑल आऊट ऑपरेशन मोहीम’ सुरू केली. रात्री दोन वाजेपर्यंत ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले होते. यावेळी पाच प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, सर्व झोनल पोलीस उपायुक्त, ३१ सहाय्यक पोलीस आयुक्त आणि ९३ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या हद्दीत विशेष मोहीम हाती घेतली होती.

पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पोलीस ठाणे, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशदरम्यान विविध ठिकाणी भेट देऊन पोलिसांचे मार्गदर्शन केले. यावेळी पोलिसांकडून २२९ ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन राबवून १ हजार ६४० अभिलेखावरील गुन्हेगार तपासण्यात आले, त्यात ३५५ आरोपी सापडले. त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. एनडीपीएस कलमांतर्गत ३५० आरोपी तपासण्यात आले. त्यात १०१ गुन्हे दाखल करून १०१ आरोपींना अटक करण्यात आली. जबरी चोरीच्या गुन्ह्यांतील ३४७ आरोपी तपासण्यात आले तर ६२ आरोपी पोलिसांना सापडले. तडीपार केलेले आणि या कारवाईचे उल्लघंन करून मुंबई शहरात वास्तव्यास असलेल्या ४६ आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. जेलमधून सुटका झालेल्या १०९ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍या प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने ९३३ हॉटेल, लॉजेस आणि मुसाफिरखााने तसेच मुंबईतील मर्मस्थळे आणि संवेदनशील असे एकूण ६०५ ठिकाणी तपासणी करण्यात आली होती. ७९ जणांवर अजामिनपात्र वॉरंट तर १९ जणांवर स्थायी वॉरंट बजाविण्यात आले होते. अवैध शस्त्रे बाळगल्याप्रकरणी एकूण ३० गुन्ह्यांची नोंद करून ३० जणांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३०हून अधिक अवैध शस्त्रे पोलिसांनी हस्तगत केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in