
धैर्य गजारा/ मुंबई
विकास आराखड्यात राखीव असलेली अधिकृत स्मशानभूमी तयार करण्यात महानगरपालिका अपयशी ठरल्यानंतर गोराई येथील ख्रिश्चन रहिवाशांनी पुढाकाराने ‘सर्वधर्म समभाव स्मशानभूमी’ उभारण्यात आली आहे, नागरिकांनी जवळपास ७ लाख रुपये जमा करून ही स्मशानभूमी उभी केली. एका आदिवासी व्यक्तीने दिलेल्या जागेवर ही स्मशानभूमी बांधण्यात आली आहे.
गोराईतील हिंदू आणि आदिवासी समुदायाने गोराई बीचवरील दगडी संरक्षक भिंतीजवळ अस्थायी व्यवस्था करून अंत्यसंस्कार करण्याची पद्धत अवलंबली होती. मात्र, या अस्थायी स्मशानभूमीत मूलभूत सुविधा नव्हत्या आणि भरतीच्या वेळी ती पूर्णतः अनुपयोगी ठरत होती. तरीही, दुसरा पर्याय नसल्याने स्थानिकांनी त्याचा वापर सुरू ठेवला.
पालिकेच्या निष्क्रियतेमुळे, गोराईतील नागरिकांनी स्वतःच्या पैशातून स्मशानभूमी उभारण्याचा निर्णय घेतला. ही स्मशानभूमी ‘जामधर पाडा’ नावाच्या टेकडीवर उभारण्यात आली असून, तेथे अंत्यसंस्कारासाठी स्टँड, पावसापासून संरक्षणासाठी छप्पर, उघड्या जागेत दफनभूमी यासारख्या सुविधा दिल्या आहेत.
‘मृत्यूही सन्मानाने व्हावा’
“माणसाने केवळ सन्मानाने जगावे असे नाही, तर त्याचा मृत्यूही सन्मानाने व्हावा. ही स्मशानभूमी सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे याच सामाजिक भावनेने स्मशानभूमी बांधणाऱ्या मजुरांनीही अत्यल्प शुल्क स्वीकारले, असे गोराई व्हिलेजर्स वेल्फेअर असोसिएशनच्या अध्यक्षा स्विटसी हेनरिक्स यांनी सांगितले.