भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूका लढवाव्या ;ठाकरेंनी सोबत न घेतल्यास प्रकाश आंबेडकरांची स्वबळाची तयारी

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक मंगळवारी वरळी येथे पार पडली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर बोलत होते.
भाजपविरोधी सर्व पक्षांनी एकत्र येऊन निवडणूका लढवाव्या ;ठाकरेंनी सोबत न घेतल्यास प्रकाश आंबेडकरांची स्वबळाची तयारी

मुंबई : देशात आज विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम सुरू आहे. विरोध न करता सोबत घेण्यासाठी धमक्या देण्यात येत आहेत. त्यामुळे आरएसएस आणि भाजपला विरोध करू शकणाऱ्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन आगामी लोकसभेच्या निवडणुका लढवल्या पाहिजेत, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले. शिवसेना ठाकरे गटासोबत लोकसभा निवडणूक लढवावी, ही आमची भूमिका आहे. पण निर्णय आता त्यांनी घ्यायचा आहे, अन्यथा आमची सर्व जागा लढविण्याची तयारी असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक मंगळवारी वरळी येथे पार पडली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेला संबोधित करताना प्रकाश आंबेडकर बोलत होते. प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर, युवा नेते सुजात आंबेडकरदेखील यावेळी उपस्थित होते. तीन राज्यांमध्ये भाजपचा विजय झाला आहे. या निवडणुकीमध्ये भाजपची पिछेहाट होईल, असे मीडियाने म्हटले होते. पण सर्वच उलट घडले आहे. अशा वेळेस सर्वांनी एकत्र येऊन देशाचे संविधान आणि जी हुकूमशाही या देशात येत आहे, त्याला थांबवण्याची गरज आहे. कारण लोकशाही वाचली तरच राजकीय पक्षांचे अस्तित्व राहील. राजकीय पक्ष वाचले तर मग सत्तेची चर्चा आपण करू शकतो. पण लोकशाहीच वाचली नाही तर राजकीय पक्ष वाचत नाही आणि आणि राजकीय पक्ष वाचले नाही तर मग सत्ताच अस्तित्वात राहणार नाही. त्यामुळे लोकशाही टिकवणे आणि त्याचबरोबर संसदीय लोकशाही टिकवणे महत्त्वाचे आहे, असे आंबेडकर म्हणाले.

“देशात अध्यक्षीय पद्धत लागू केली तर एकाच समाजाचा पंतप्रधान, राष्ट्रपती होऊ शकतो, दुसरे कोणी नाही. त्यामुळे हा संसदीय लोकशाहीला तसेच आता जे प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होणार आहे,” अशी भीती आंबेडकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे २०२४ मध्ये संसदीय लोकशाही टिकविण्यासाठी एकमेकांमध्ये संबंध ठेवले पाहिजेत, एकत्र येऊन लढले पाहिजे, असे सांगतानाच राष्ट्रीय पक्षांपैकी कोणीतरी पुढाकार घेऊन प्रादेशिक पक्षांना एकत्र बांधण्याची जबाबदारी उचलली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

४८ जागांची आमची तयारी

लोकसभा निवडणुकीतील जागा वाटपा संदर्भातील सर्व निर्णय आता शिवसेना ठाकरे गटाच्याकडे आहे. त्यांच्यासोबतच जाण्याची आमची भूमिका आहे. मात्र जर त्यांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही सर्व ४८ जागांची तयारी करीत आहे असेही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in